Maharashtra Bandh Withdraws: मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेला बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर आघाडीकडून हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र उद्धव ठाकरेंसह आघाडीतील नेते उद्या काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करणार आहेत.
उच्च न्यायालयाने शनिवारचा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला, मात्र शनिवारी ते स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. बंद नसला तरी प्रत्येक गावात प्रत्येक शहरात काळ्या फिती लावून निषेध करणार आहोत, आंदोलन करणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले.
शुक्रवारी दुपारी बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा संध्याकाळी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. उद्या महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून निषेध करणार आहे. मी शिवसेना भवनासमोरील चौकात उद्या सकाळी ११ वाजता तोंडाला काळ्या फिती लावून बसणार आहे. त्याला कोणी मनाई करु शकत नाही. त्याला मनाई केली तर जनतेचे न्यायालय आहे. भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वांना आपल्या कुटुंबाची काळजी आहे. बहीण, आईची काळजी आहे. तिचे रक्षण करणारे कोण आहे, हे सर्वांच्या मनात आहे. यामुळे बंद करायचा प्रयत्न केला. बंद कायद्यानुसार करता येत नसल्याने मी तोंडाला काळीफीत लावणार आहे. माझे रक्षण करण्यासाठी कोणी येत नाही असे लोकांना वाटते, तेव्हा लोक रस्त्यावर उतरतात. बांगलादेशात ते सर्वांनी पाहिले आहे. ते आपल्या देशात होऊ नये म्हणून आमचे प्रयत्न आहेत. सरकार नराधमांना पाठीशी घालवत आहे. उत्स्फूर्तपणे आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. ते स्वतःच्या विश्वात मश्गुल आहेत. त्यामुळेच आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. लोकांना जागरूक करत आहोत, असेही ते म्हणाले.
दुपारी मी उद्याच्या बंदबाबत तुमच्याशी बोललो. उद्याच्या बंद बद्दल काही सूचना दिल्या होत्या. उद्याचा बंद विकृतीविरोधी होता. मात्र न्यायालयाने तत्परतेने या बंदला मनाई केली. न्यायालय एवढ्या तत्परतेने हलू शकते हे कौतुकास्पद आहे. तुम्ही तत्परतेने निर्णय दिला, तशीच तत्परता तुम्ही जे गुन्हे घडता त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठीही दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. महिलांवरील अत्याचार करणारे जे नराधम आहेत, त्यांच्यावर वचक बसण्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. बंद होणार नसलं तरी आंदोलन करणार आहोत. माता भगिनींसाठी सुरक्षित बहीण हे आंदोलन करणार आहोत.
वास्तविक बंद आम्ही उद्याच जाहीर केला होता. पवारसाहेब आणि पटोले बाहेर आहेत. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो नाही. फोनवरून बोलणे झाले. पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू. भविष्यात बंद करणार नाही, असं नाही. संप करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. पुन्हा सांगतो, न्यायालयाचा निर्णय मान्य नाही. पण न्यायालयाचा आदर करून आम्ही निर्णय स्वीकारत आहोत असेही ते म्हणाले