samarjit singh ghatge : आज कोल्हापूरमध्ये समरजीतसिंह घाटगे यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शरद पवार गटाचे जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रवेशावर समाधान व्यक्त केलं आहे.
आम्ही टप्प्यात आला की लगेच कार्यक्रम करतो
जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी केली आहे. ते म्हणाले की, ”आम्ही टप्यात आला की लगेच कार्यक्रम करतो. गेल्या वर्षभरापासून माझ्या मनात असलेली चिंता आज मिटली याचा आनंद मी व्यक्त करतो. यापूर्वी लोकसभेला शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे तुम्ही दाखवून दिल आहे. आता विधानसभेला देखील दाखवून द्यायचे आहे”. असे म्हणत येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश होईल असे राष्ट्रवादी जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. यामुळे कागलच्या राजकारणाला आता नवीन वळण लागले असून आगामी विधानसभा निवडणूक ही मुश्रीफ विरुद्ध घाटगे होणार असली तरी शरद पवार विरुद्ध अजित पवार असेच ही निवडणूक पाहिली जाणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कागल विधानसभा मतदारसंघात भाजप नेते समरजीतसिंह घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज या चर्चेला पूर्णविराम लागले असून समरजीत सिंह घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात येत्या 3 तारखेला कागलच्या गैबी चौकात भव्य सभा घेत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. यामुळे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल मध्ये राजकीय भूकंप झाला असून या भूकंपाचे हादरे आता त्यांचे विरोधक असलेले हसन मुश्रीफ यांना बसणार की आणि कोणाला? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. समरजीतसिंह घाटगे यांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला कागलमध्ये नवी उभारी मिळाली आहे.