Sharad Pawar on CM Candidate: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये यंदा अटीतटीचा सामना रंगणार असून मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असणार याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. यावर आता शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
‘मुख्यमंत्री पदासाठी इंटरेस्ट नाही, परिवर्तन हवंय’
पुणे येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या चर्चांवर स्पष्ट उत्तर दिले आहे. पवार म्हणाले, आमच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी कोणालाही इंटरेस्ट नाही. आम्हाला परिवर्तन हवं आहे आणि जनतेला पर्याय हवा आहे, त्यासाठीच आम्ही काम करत आहोत.
कागलमध्ये ३ सप्टेंबरला जाहीर सभा
कागल मतदारसंघाबाबत शरद पवार म्हणाले, मी ३ तारखेला कागलला जातोय. कागलकरांच्या आग्रहास्तव तिकडे सभा घेणार आहे. अनेक जण भेटण्यासाठी येत आहेत. तर जागावाटपाबाबत बोलताना ‘तीन पक्ष विधानसभेसाठी एकत्रित आहेत, यामध्ये डावे पक्ष देखील यावेत अशी इच्छा आहे. मतदारसंघ कोणते घ्यावेत यावर विचारविनिमय करायला बैठक आयोजित केली होती पण आता २७ तारखेला तिन्ही पक्ष एकत्रित बसतील, लवकरात लवकर मतदारसंघाचे निर्णय घ्यावा अशी अपेक्षा’ असल्याचे पवार म्हणाले आहेत.