Nepal Bus Accident: देवदर्शनाला जाणाऱ्या आपल्या नातेवाइकांना १६ ऑगस्ट रोजी चैतन्यमय वातावरणात निरोप दिला, आणि त्यांचाच काळाने घात केल्याने गावावर दु:खाची छाया पसरली.
अवघे गाव शोकसागरात बुडाले
भाविकांच्या बसला अपघात झाल्याची बातमी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे दुपारी १२ वाजता समजली. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. देवदर्शनाला जाणाऱ्या आपल्या नातेवाइकांना १६ ऑगस्ट रोजी चैतन्यमय वातावरणात निरोप दिला, आणि त्यांचाच काळाने घात केल्याने गावावर दु:खाची छाया पसरली. ज्यांचे नातेवाईक या बसमध्ये होत, त्या कुटुंबांची क्षणाक्षणाला घालमेल सुरू झाली. फोनवरून येणाऱ्या प्रत्येक बातमीमुळे त्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. त्यात सायंकाळी गावातील एका मुलीसह दहा भाविकांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच अवघे गाव शोकसागरात बुडाले. सायंकाळी एकाही घरात चूल पेटली नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राजकीय पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी गावात भेट दिली.
वारकरी कुटुंबातील चौघांचा मृत्यू
या अपघातात वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासह नातेवाइकांना मोठा धक्का बसला. संदीप राजाराम सरोदे, पल्लवी संदीप सरोदे, गोकर्ण संदीप सरोदे, अनुप हेमराज सरोदे या चौघांचा मृत्यू झाला. तर, कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत. सरोदे कुटुंबाचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. संदीप सरोदे हे पत्नीसह पंढरीची वारी करतात, तसेच गावात भागवत सप्ताहही भरवतात. अशा धार्मिक वृत्तीच्या कुटुंबातील चौघांचा देवदर्शनादरम्यान मृत्यू झाल्याने सर्व सुन्न झाले.
मुलाला म्हणाले, पशुपतीनाथांचे दर्शन घेतो…
गुरुवारी रात्री शुभमचे आई-वडील पोखराला पोहचले होते. वडिलांचा रात्री ७ वाजता फोन आला, ‘सकाळी काठमांडूला जाऊन पशुपतीनाथांचे दर्शन घेणार आहे’, असे त्यांनी सांगितले. आई बाहेर असल्याने बोलणे झालेच नाही. सकाळी काठमांडूला पोहचल्यानंतर त्यांना फोन करणार होतो. मात्र, त्या आधीच अपघात झाला आणि होत्याचे नव्हते झाले. बस अपघाताने शुभमचे आई-वडिलांचे छत्र हरपले. त्याचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.