शिशुवर्गातील विद्यार्थिनी अत्याचारप्रकरणी एसआयटीच्या चोकशीत ठपका ठेवल्यानंतर अखेर शाळा व्यवस्थापनाविरोधातही पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिवांसमोर चौकशीसाठी उपस्थित असलेल्या शाळा व्यवस्थापनाचे संचालक आणि इतर सदस्यांनी चौकशीला सामोरे न जाता पळ काढल्याने चौकशी अधिकाऱ्यांकडून संचालक आणि इतर मंडळींचा शोध सुरू होता.
या शाळेवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारकडून नियुक्त केलेल्या एसआयटीने केलेल्या चोकशीअंती शाळा व्यवस्थापनावर ठपका ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी शाळा व्यवस्थापनावरही पोक्सो कायद्यांतर्गत बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी यांनी शुक्रवारी या प्रकरणाशी संबंधित सर्व शासकीय विभाग, शाळेच्या निलंबित मुख्यध्यापिका, शाळा व्यवस्थापन यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र या चौकशीला सामोरे न जाता शाळेचे संचालक तसेच व्यवस्थापनातील मंडळींनी पळ काढला. त्यानंतर चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांकडून विचारणा होत असताना शाळा व्यवस्थापनाची एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नसल्याने त्यांचा शोध घेण्यात येत होता.