आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी दिली. जागावाटपासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पुढील बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली. शनिवारी पार पडलेल्या या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबईतील २० जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील जागावाटपासंदर्भात शनिवारी मुंबईतील प्रमुख नेत्यांची विशेष बैठक शनिवारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय राऊत, अनिल देसाई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जितेंद्र आव्हाड, राखी जाधव मुंबई काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, भाई जगताप आदी उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील सर्व जागांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. या बैठकीत बदलापूर घटनेबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
या बैठकीत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे येत्या निवडणुकीत नेतृत्व करणार आहेत. प्रचारासाठी ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबईत शिवसेनेचे येथे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे किमान वीस जागा मिळाव्यात, अशी मागणी पक्षातील नेते मंडळींकडून करण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
२७ ते २९ ऑगस्ट रोजी मुंबईत बैठका
मुंबईत शनिवारी पार पडलेल्या बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्मुल्यावर चर्चा झाली. मुंबईत शिवसेना (ठाकरे) २० जागांसाठी आग्रही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) ७ तर उर्वरित ९ जागांवर काँग्रेसने लढवाव्या यावर खलबतं झाल्याची माहिती आहे. जागावाटपाच्या चर्चेती मुंबईपासून सुरुवात झाली असून २८८ जागांवर निर्णय घेण्यासाठी २७, २८ आणि २९ ऑगस्ट रोजी बैठकांचे सत्र सुरू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.