दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते चियान विक्रम यांचा थंगालान सिनेमा खूप गाजत आहे.कोलार गोल्ड फिल्डचा म्हणजेच केजीएफचा इतिहास चित्रपटात पाहायला मिळतो. इंग्रजांनी केजीएफला शोधून तिथल्या सोन्याची कशी लूट केली होती. तिथल्या लोकांना कशी वागणूक दिली याचे भयाण वास्तव चित्रपटातून मांडल्या गेलं आहे. काहीसा असाच इतिहास वैरागडाचा. थंगालान म्हणजे ‘ सोन्याचा पुत्र ‘.या पुत्राने केजीएफच्या सोन्याची रक्षा केली. त्याचप्रमाणे वैरागड येथील भूमिपुत्रांनी येथील हिऱ्याच्या खाण्यांची रक्षा करताना स्वताचे रक्त सांडविले आहे.
काय आहे इतिहास…
वैरागडचा भुभाग महाभारत, रामायणातील दंडकारण्यातील एक महत्त्वाचा भूप्रदेश होता. तशी नोंद पुराण ग्रंथात सापडते. येथे नागवंशिय माना राज्यांची सत्ता होती.1176 ते 1193 या काळात शिलाहार राजा भोज यांनी किल्ल्याचे बांधकाम केले. यादवानी हा किल्ला जिंकला. यादवांचा पतनानंतर हा किल्ला आदिलशाहीत आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाई प्रांत जिंकला.त्यावेळी हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट झाला होता. औरंगजेबाने इसवी सन 1699 मध्ये हा किल्ला जिंकला. मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. 1818 मध्ये इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला.
हिऱ्याचा खाणीसाठी युद्ध
संस्कृत मध्ये हिराच्या खाणीस वैरागर, वज्राकर म्हणतात. त्यावरून या शहराला वैरागर नाव पडले. पुढे वैरागड या नावाने हे शहर ओळखू लागल्या गेले. येथील हिऱ्याची खान त्यावेळी प्रसिद्ध होती. ही खान मिळवण्यासाठी अनेक युद्ध झालीत. 1422 मध्ये अहमद शहा बाहमनी येथे युद्ध केले होते.या युद्धात 108 मुस्लिम सैनिक मारले गेलेत.त्यांचा कबरी आजही येथे सापडतात. नागवंशीय माना राज्यांनी आणि त्यानंतर गोंड राज्यांनी येथे हिरे काढण्याचा प्रयन केला होता. गोंड राजांचा पराभव करीत ब्रिटिशांनी या खाणी ताब्यात घेतल्या. त्यांनी येथे हिऱ्यासाठी उत्खनन केलं.
महाराष्ट्राच्या इतिहासाला समृद्ध करणाऱ्या विरगाथा…
वैरागडच्या भूप्रदेशावर गोंड बांधवांची मोठी वस्ती होती. निसर्ग पूजक असलेले हे बांधव आपल्या भूप्रदेशात असलेल्या खनिज संपत्तीचे संरक्षण करायचे. खनिज संपत्तीचे संरक्षण करताना येथील आदिवासी बांधवांच्या रक्तांनी ही भूमी अक्षरस लाल झाली आहे. त्यांच्या इतिहासावर थंगालान, कांतारा, केजीएफ सारखे शेकडो चित्रपट तयार होवू शकतात.मात्र जिथे इतिहासाने त्यांना दुर्लक्षित केलं तिथे चित्रपट निर्मिती करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवायची. महाराष्ट्राच्या इतिहासाला समृद्ध करणाऱ्या त्यांच्या गाथा आहेत. त्यांच्या वीरगाथांना इतिहासात स्थान मिळू शकले नाही,ही मोठी शोकांतिका आहे.