प्रचार खर्चाच्या तुलनेत कमी खर्चात सर्वसामान्यांपर्यंत हमखास पोहोचण्याचे माध्यम म्हणजे सण-उत्सव. येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणुकांचे चौघडे वाजणार आहेत. यंदा निवडणुकीमुळे सराव शिबिरातही लाखोंची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. राज्य सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजनाही सराव शिबिरातील बॅनरवर झळकू लागली आहे. शिवसेनेतर्फे ‘लाडक्या बहिणींचा लाडका गोविंदा’ सराव शिबीर आयोजित करण्यात आले. सांताक्रूझ येथे २२,२२,२२२ रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. राज्य गोविंदा दहीहंडी असोसिएशन आणि पार्लेश्वर प्रतिष्ठानचे विलेपार्ले येथील शिबीर असो, की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शीव, मालाडमधील शिबीर, सर्वच ठिकाणी लाखोंच्या बक्षिसांची घोषणा झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षांतील युवा नेते, ज्येष्ठ पुढारी यांनी ही शिबिरे भरवून मतदारांना साद घातली आहे. हिंदी-मराठी कलाकारांना गोपाळकाल्याच्या दिवशी विशेष मागणी असते. सध्याच्या सराव शिबिरातही सेलिब्रिटी चेहरे झळकू लागले आहेत. नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वांद्रे पूर्वेत यूट्युबर-रॅपर यांनी गोपाळकाल्याच्या आधीच हजेरी लावली आहे.
चर्चेत राहण्यासाठी प्रयत्न
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सर्वपक्षीय उमेदवारांकडून सण-उत्सवांच्या माध्यमाने चर्चेत राहण्यासाठी शक्य ते प्रयत्न सराव शिबिरातूनच सुरू असून गोपाळकाल्याच्या दिवशी कळस गाठला जाणार आहे. महिला-पुरुषांच्या पारंपरिक गोविंदासह फिरता मानवी मनोरा रचणारे गोविंदा, मानवी मनोऱ्यावर पथनाट्य करणारे गोविंदा, दृष्टिहीन गोविंदा यांना सराव शिबिरासाठी विशेष आमंत्रणे आहेत. अशा गोविंदा पथकांसाठी विशेष चषक, टी-शर्ट, नाश्ता, बसभाडे आणि मानधन अशी सरबराई पुढाऱ्यांच्या दहीहंडी उत्सवात केली जात आहे.