केवळ स्वप्न दाखविण्याचे काम, रिंग रोडची प्रतीक्षा कायम, प्रकल्प कधी मार्गी लागणार?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे आणि परिसराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रो, अवजड वाहनांना ठराविक काळासाठी बंदी अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्या, तरी वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) विकसित झाल्यासच कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि आता महायुतीच्या काळातही रिंग रोडचे केवळ स्वप्न दाखवले जात असून, त्याचे प्रत्यक्ष काम कधी केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा कोंडीत फसलेल्या सर्व वाहनचालकांना आहे.

प्रवेशबंदीचा प्रस्ताव

शहर आणि शहराभोवतीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना गर्दीच्या वेळी कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर प्रवेश बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास त्यातून तात्पुरता दिलासा जरूर मिळणार आहे; पण एकूणच वाहनांची वाढणारी संख्या पाहता अधिक दूरगामी निर्णयाची अपेक्षा आहे.
Mumbai-Goa Highway: ‘मुंबई-गोवा’वर जड वाहनांना बंदी; गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय

नियोजन कागदावरच

पुण्यातून जाणारी वाहतूक थेट बाहेरच्या बाहेर वळविण्यासाठी वर्तुळाकार मार्ग विकसित करण्याचे नियोजन अनेक वर्षे कागदावर आहे. त्यासाठी आराखडा, भूसंपादन आणि त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, त्याबाबत अजूनही अंतिम निर्णय झाला नसल्याने या रिंग रोडचे काम सुरूच होऊ शकलेले नाही.
Maharashtra Teacher: राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय; ‘या’ कामांतून शिक्षकांची सुटका

महत्त्वाचा प्रकल्प

मुंबईहून येणारी आणि साताऱ्याच्या दिशेने जाणारी अनेक वाहने सध्या या बाह्यवळण मार्गावरून जातात. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून थेट पुणे-सातारा रस्त्याला जोडणाऱ्या रिंग रोडमुळे ही सर्व वाहतूक परस्पर बाहेरच्या बाहेर सातारा, कोल्हापूर व दक्षिणेकडे जाऊ शकणार आहे. तसेच, पुणे-नाशिक, पुणे-छत्रपती संभाजीनगर या महामार्गांवरील वाहतूक कोंडी रिंग रोडमुळे काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.

पालकमंत्री, निर्णय घ्या..

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी होईल, याकडे बारकाईने लक्ष देतात. महाविकास आणि महायुती या दोन्ही सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत जवळपास साडेतीन वर्षे पुण्याचे पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच आहे. या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. आता अखेरच्या टप्प्यात या रिंग रोडचे प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, यासाठी त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान योजनेतून ते राज्यात ठिकठिकाणी दौरे काढत आहेत. वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या बहिणींना दिलासा देण्यासाठी आणि कोंडीमुक्त रस्त्यांद्वारे नागरिकांचा सन्मान करण्यासाठी आता या रखडलेल्या रिंग रोडला त्यांनी गती देण्याची अपेक्षा आहे.

Source link

Pune Ring RoadPune Ring Road Planningpune trafficअजित पवार पुणे रिंग रोडपुणे रिंग रोड प्रकल्पपुणे वाहतूक कोंडीपुणे वाहतूक कोंडी बातम्या
Comments (0)
Add Comment