या घटनेनंतर तातडीने भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल. कार्यकर्त्यांनी अगोदरच हर्षवर्धन पाटील यांच्यावर दबाव आणण्यासाठी इंदापूर तालुका विकास आघाडीची स्थापना केलेलीच आहे, परंतु दहा वर्षे सत्तेत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत आमदारकी मिळवायची असेल, तर मतविभाजनाचा फटका बसू नये यासाठी हर्षवर्धन पाटलांनी तुतारीचाच पर्याय स्वीकारावा असा आग्रह देखील आता होऊ लागला आहे.
या सगळ्या परिस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील नेमके काय करणार याची उत्सुकता आहे. दोन दिवसापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे कौतुक करत आपण आयुष्यभर त्यांच्याशी असलेले नाते जपणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले. या वक्तव्यातून राजकीय अर्थ काढला गेला, तर हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहेत असाच अर्थ बांधला जात आहे. त्याला आणखी एक कारण म्हणजे इंदापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बावड्यानजीक वकील वस्ती ते बावड्यापासून काही अंतरावर असलेल्या लाखेवाडी पर्यंतच्या अंतरात तब्बल पाऊण तास कुठेतरी थांबलेले होते.
गुप्तगू केल्याची चर्चा…
यादरम्यान जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशीच गुप्तगू केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचे ना जयंत पाटलांनी खंडन केले आहे, ना हर्षवर्धन पाटलांनी..! तसेच याला दोघांनीही दुजोरा दिलेला नाही. बावडा येथील निवासस्थानी अथवा शहाजीबाग येथे हर्षवर्धन पाटील आणि जयंत पाटील यांच्यात काहीतरी चर्चा झाली आहे, अशी चर्चा आहे. या चर्चेचा अर्थ हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीकडे कल असल्याचे सांगितले जाते.
मोहिते पाटलांशी खास कनेक्शन
दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इंदापूर तालुक्याचा काही भाग हा माळशिरस तालुक्याशी जोडलेला आहे. तो सदाशिवनगर साखर कारखान्याच्या निमित्ताने असेल किंवा मोहिते पाटलांच्या प्रभावाने असेल; परंतु हर्षवर्धन पाटील यांनी नेहमीच मोहिते पाटील घराण्याशी मिळते जुळते घेतले आहे. तेच मोहिते पाटील घराणे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले आहे. अर्थात अजूनही भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांची भूमिका स्पष्ट नसली, तरी दोन दिवसापूर्वीच त्यांनी देखील शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत.
एकूणच इंदापूर तालुक्यातील निरा पट्ट्यातील काही गावांवरील मोहिते पाटलांचा प्रभाव आपल्याकडे वळवायचा असेल, तर त्यांच्याशी गाठ बांधलेली बरी असा सूर देखील कार्यकर्त्यांमध्ये असतो. दुसरीकडे सन २०१९ मध्ये देखील मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर लागलीच हर्षवर्धन पाटील देखील त्यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये गेले होते. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील आणि मोहिते पाटील यांचे एकूण राजकीय संबंध लक्षात घेता, हर्षवर्धन पाटील हे तुतारीशी जुळून घेण्याच्या प्रयत्नात असतील असेही आता बोलले जात आहे. असे झाल्यास इंदापूर तालुक्यात दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात जोराची लढत होऊन सहानुभूतीचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना मिळू शकतो.
विधानसभेला मात्र आम्ही वाईट ठरतो…!
इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील जर भाजपमधून उभे राहिले तर ते निवडणूक हरतील असा सूर सार्वत्रिक होता. त्याची दखल देखील हर्षवर्धन पाटलांनी घेतली असावी, कारण महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार लोकसभेमध्ये चांगला केल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे वागलो. परंतु प्रत्येक वेळी आमच्याकडून काम करून घेतले जाते आणि विधानसभेला मात्र आम्ही वाईट ठरतो, असे प्रत्येक पत्रकार परिषदेतून सांगत हर्षवर्धन पाटील सध्या सहानुभूतीचा जोर आजमावत आहेत.
अजित पवारांचा पक्ष मात्र प्रामाणिकपणे वागत नाही!
या माध्यमातून आम्ही प्रामाणिकपणे वागतो, परंतु अजित पवारांचा पक्ष मात्र प्रामाणिकपणे वागत नाही हे दाखवण्याचा हर्षवर्धन पाटलांचा प्रयत्न आहे. या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील जनसामान्यांची सहानुभूती घ्यावी असा देखील यामागचा प्रयत्न असावा असे बोलले जात आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीत जर दुरंगी लढत झाली आणि हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे असा जर सामना झाला तर यावेळी दत्तात्रय भरणे यांना नकारात्मक लाटेचा फटका बसू शकतो आणि हर्षवर्धन पाटलांना सहानुभूतीचा फायदा मिळू शकतो असे चित्र आहे.