तुतारीला अच्छे दिन, इच्छुकांची संख्या वाढली, शिंदेंच्या मंत्र्याच्या पुतण्याने पवारांची भेट घेतली!

सोलापूर : राज्यातील दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आणि युती आघाड्यांच्या खेळात राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटून गेली आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. स्थानिक राजकीय समीकरणे पाहून तसेच लोकांचा कल ओळखून इच्छुक उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. विधानसभेसाठी ते तुतारीकडून लढण्यास इच्छुक आहेत.

पंढरपूर विधानसभेसाठी इच्छुक अनिल सावंत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यातील मोदी बागेत जाऊन भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. विधानसभेसाठी स्थानिक समीकरणे अनुकूल असल्याचे सांगत तुतारीवर लढलो तर विजय संपादन करेन, असे सर्वेक्षण सांगत असल्याचे सावंत यांनी पवारांना सांगितल्याचे कळते. पंढरपूरमधून लढण्यासाठी अनिल सावंत-प्रशांत परिचारक यांच्यात स्पर्धा आहे. दुसरीकडे साखर सम्राट अभिजीत पाटील कधीही उडी मारून भूमिका बदलू शकतात, अशी परिस्थिती आहे.
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार, सुप्रिया सुळे यांच्या विधानाने चर्चांना उधाण, भाजपला सलग दुसरा मोठा धक्का?

अनिल सावंत यांच्याकडून चाचणीला सुरुवात

अनिल सावंत यांनी मतदारसंघात गावभेट दौरे, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आगामी विधानसभेला कोणता पर्याय निवडावा? तुतारीवर लढण्याचा पर्याय तुम्हाला कसा वाटतो? असे प्रश्न सावंत यांचे निकटवर्तीय पदाधिकारी कार्यकर्त्यांना विचारत आहेत. लोकांचा कल पाहून कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचा प्रसार करायला सोशल मीडियावर सुरुवात केली आहे.
हर्षवर्धन भाऊंकडून मोर्चेबांधणीला सुरुवात, कार्यकर्त्यांचा आग्रह तुतारी घ्या! इंदापुरात काय होणार? खास विश्लेषण…

पंढरपूरमध्ये काय होऊ शकते?

भारत नाना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्यात काँटे की टक्कर झाले. या निवडणुकीत भालके यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. विद्यमान आमदार या नात्याने महायुतीकडून आवताडे हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने इच्छुकांची रांग पवार यांच्याकडे जाऊन चर्चा करत आहे.


लोकसभेआधी पंढरपूरमध्ये साखर सम्राट अभिजीत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून पाहिले गेले. परंतु ईडीची धाड पडताच त्यांनी पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचीही विधानसभा लढण्याची इच्छा आहे. दुसरीकडे आवताडे यांना निवडून आणण्यात प्रशांत परिचारक यांचा मोठा हात आहे. त्यांच्याही मनात विधानसभा लढण्याची सुप्त इच्छा आहे. तिसरीकडे अनिल सावंत यांच्याकडूनही विधानसभेची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेऊन ते पुढील निर्णय घेणार आहेत.

Source link

Anil Sawant met Sharad PawarMinister tanaji Sawantpandharpur Vidhan SabhaSharad Pawartanaji Sawant Nephew Anil SawantVidhan Sabha Election 2024अनिल सावंत शरद पवार भेटतानाजी सावंतपंढरपूर विधानसभा
Comments (0)
Add Comment