महायुतीचा धर्म पाळणं, ही महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाची जबाबदारी आहे, पण वडगावशेरीच्या आमदारांना महायुतीचा विसर पडला आहे. वडगावशेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, हे नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. पण याच विकासकामांचा पाठपुरावा आमच्यासारख्या महायुतीतील मंडळींनी केला आहे, हे आमदार जाणीपूर्वक विसरत आहेत. तीनशे कोटींच्या विकासकामांचा निधी मिळतो, तेव्हा त्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचंही योगदान आहे, पण त्यांचा साधा फोटो टाकण्याचे सौजन्यही आमदार महोदय यांनी श्रेय लाटण्याच्या स्वार्थी भावनेत दाखवले नाही अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली आहे.
अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनापूर्वीच मुळीक टिंगरे भिडल्याने महायुतीत ऑल इज नॉट वेल असे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवारांच्या नेतृत्वात राज्यात जनसन्मान यात्रा काढली आहे. हीच यात्रा आज जुन्नरमध्ये पोहोचली होती. जनसन्मान यात्रा जुन्नरमध्ये दाखल होताच भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, घोषणाबाजी केली आणि निषेध नोंदवला. अजित पवारांनी घटक पक्षांना डावलले आहे, असा आरोप आशा बुचकेंसहित त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याच प्रकरणावरुन अमोल मिटकरी आणि जगदीश मुळीक असा वाद रंगला होता. आता त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीच्या विकासकामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.