त्याशिवाय याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की गृहखात्यामध्ये भोंगळपणा आलेला आहे. अधिकारी कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागले आहेत. सरकारने पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभं राहत, ही दुष्ट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजेत. सरकारचे प्रशासनावर लक्ष नाही. पोलिसांच्या बदल्यांवरच सरकारचं जास्त लक्ष आहे. हे सरकारचं सपशेल अपयश असल्याची, टीका त्यांनी केली.
‘दोन महिन्यांसाठी त्यांचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही’
बदलापूर चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत, आता दोन महिने राहिले असून या दोन महिन्यांसाठी त्यांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ नसल्याचं म्हणत टोला लगावला.
त्याशिवाय त्यांनी महायुती सरकार पूर्णपणे फेल असल्याचं म्हटलं आहे. हे सरकार अपयशी सरकार असून महिला, लहान मुलांचं संरक्षण करू शकत नाही. आता तर पोलिसांवरही हल्ले होत असून त्यांचंही संरक्षण करण्याची वेळ आली आहे. सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे लक्ष नाही. पोलिसांवरच हल्ले होत असल्याने पोलीस व्यवस्था किती दुबळी झाली आणि गुन्हेगारी किती प्रबळ झाली आहे हे दिसत आहे, असं म्हणत त्यांनी राज्यातील सरकारवर टीका केली आहे.