या प्रकरणातील सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहानुरमियाँ दर्गा परिसरात राहणारे प्रकाश भुसारे यांची मुलगी प्रतीक्षा हिचा विवाह चार महिन्यांपूर्वी कन्नड येथील प्रीतम गवारे याच्याशी झाला. प्रतीक्षा एमबीबीएस झालेली असून, ती गेल्या एक महिन्यापासून एमजीएम रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होती. लग्नानंतर काही दिवसांपासून हे दोघेही टेलिकॉम हाउसिंग सोसायटी, बजाजनगर येथे राहत होते.
राखी पौर्णिमानिमित्त प्रीतम गावी गेला होता. प्रतीक्षाने त्याला दुपारी बोलवून घेतले होते. प्रीतम शनिवारी (२४ ऑगस्ट) दुपारी एक वाजता घरी आल्यानंतर त्याला प्रतीक्षाने गळफास घेतल्याचे दिसून आले. प्रीतमने तिला तत्काळ बेशुद्ध अवस्थेत एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड करीत आहेत.
पोलिसांना सापडली चार पानांची सुसाइड नोट
प्रतीक्षाला एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रीतमने प्रतीक्षाच्या नातेवाइकांना मोबाइलवरून ‘प्रतीक्षा आजारी असून, तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे,’ असे कळवले. प्रतीक्षाचे नातेवाइक हॉस्पिटलमध्ये येताना दिसताच प्रीतमने तेथून काढता पाय घेतला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनास्थळी पंचनामा केला असता प्रतीक्षाच्या घरातून चार पान सुसाइड नोट मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुसाइड नोटमध्ये काय?
डिअर अहो, खूप प्रेम केलं तुमच्यावर, स्वत:ला विसरुन गेले. तुम्ही माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं. तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं. खूप स्वप्न घेऊन तुमच्याशी लग्न केले होते. तुम्ही मला खूप जीव लावाल, काळजी घ्याल. करिअरमध्ये सपोर्ट कराल. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं. पण आज ही वेळ आणलीत तुम्ही माझ्यावर, असं या डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये लिहिलं.
पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याचं या डॉक्टरने पत्रात लिहिलं आहे. तसेच, त्याच्या सांगण्यावरुन मित्र-मैत्रिणी काय नातेवाईक आणि घरच्यांशी बोलणं देखील सोडलं, असं ती म्हणाली. तुम्ही जे सांगितलं ते सर्व केलं, पण तरी तुम्ही सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत राहिलात, पण मी फक्त तुमच्याशी प्रामाणिक होते, असंही ती म्हणाली. तसेच, यामध्ये तिने आपल्या आई-वडिलांची आणि भावाची माफीही मागितली आहे. पण, मला असं जगावं वाटत नाही, असं ती म्हणाली.