राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार रविवारी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यानिमित्त अतुल बेनके यांनी बॅनरबाजी करत शरद पवार यांचे स्वागत केले. या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचे हार्दिक स्वागत असे लिहिण्यात आले होते. बॅनरवर आमदार अतुल बेनके, शरद पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचे फोटो होते. परंतु अजित पवार यांचा फोटो नसल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. मात्र या चर्चांना अतुल बेनके यांनी उत्तर दिले आहे.
अतुल बेनके काय म्हणाले?
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी अजित पवार यांच्याकडूनच लढणार आहोत. मात्र शरद पवार यांचे विचार पुढे घेऊन जाणार असल्याचे देखील अतुल बेनके यांनी सांगितले. माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. माझी लढाई शरद पवारांच्या विरुद्ध आहे असे समजायचे कोणी कारण नाही. माझा शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेशसुद्धा नाही. कोणीही त्याचा वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार येणार म्हटल्यावर त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य होते. जशी कौटुंबिक नात्याने पवार फॅमिली एक आहे. तसेच माझ्यासोबत त्यांचे नाते आहे. मी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणूक लढणार आहे. मात्र शरद पवार यांचा विचार पुढे घेऊन जाणार आहे.
याशिवाय शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासोबत मी विकासासाठी असणार आहे. पुढचे पाच वर्ष अमोल कोल्हे हे खासदार असणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पुढचा खासदार पुढचा आमदार मीच राहणार आहे. पुढच्या पाच वर्षात आम्ही दोघे मिळून तालुक्याचा विकास करणार असल्याचे बेनके यांनी सांगितले आहे. मी तालुक्याच्या विकास कामातून पुढे येत असल्याने कुणी कितीही आंदोलने केली तरी मी तालुक्याला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. असा टोला देखील अतुल बेनके यांनी आशा बुचके यांना लगावला आहे.