सच्च्चा मित्र गमावला
खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनाने भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे. ”सच्च्च्या मित्राला मी गमावलं”, अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. १९९२ पासून आमची मैत्री होती. माझे आणि त्यांचे चांगले नातेसंबंध होते. पण नात्याच्या पलिकडे त्यांची आणि माझी मैत्री होती. मी कालच त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी हैदराबदला गेलो. त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की प्रगती होतेय. उशीरा रात्री मी नांदेडला पोहोचलो आणि सकाळी मला ही बातमी समजली. त्यांच्या निधनाने नांदेडचं नुकसान झाल्याचं चिखलीकर म्हणाले आहेत.
यंदाची लोकसभेची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची होती. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला आणि ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या नांदेडमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक चुरशीची झाली. अशा परिस्थितीत २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून वसंत चव्हाण यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला बायबाय केल्यानंतर कॉंग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्त्वपूर्ण होता.
अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते अशोक चव्हाण यांनी वसंत चव्हाण यांच्यासोबतच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नेते आणि नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देऊन आज ना उद्या ते बरे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, आज पहाटे काळाने त्यांच्यावर दुर्दैवी घाला घातला. खा. वसंतराव चव्हाण व आमचे दोन पिढ्यांचे संबंध होते. आमच्या वडिलांनी एकत्र काम केले, आम्ही सुद्धा राजकारण व सहकार क्षेत्रात अनेक वर्ष सोबत राहिलो. नांदेडचे खासदार म्हणून त्यांना प्रथमच केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी लाभली होती. मात्र, त्यांच्या निधनाने ग्रामीण भागाची नाडी उत्तमपणे जाणणारे एक संयमी, विनम्र व अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.