शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी पश्चिम विधानसभा कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, ज्योती ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील सरकार घटनाबाह्य असून, जनतेसमोर जायला घाबरत आहे. महापालिका, नगरपालिकांसह अनेक निवडणुका उशिराने येत आहेत. राज्याची आस्मिता, आत्मा चिरडला जात आहे. महाराष्ट्राला जे हक्काचे मिळालया हवे होते, जी प्रगती महाराष्ट्राची व्हायला हवी होती. ती झाली आहे का, असा प्रश्न तरुणांनी स्वत:ला विचारायला हवा. मागील दोन वर्षांत राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवले गेले. जे आहेत त्यांना पळविण्याचे काम सुरू आहे. जे येणार आहेत त्यांना रोखण्याचे काम सुरू आहे.’
‘राज्यातील गुंतवणूक पळविण्याचे काम सुरू आहे. भाजपचे राजकारण महाराष्ट्रविरोधी आहे. राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी नाहीत. महाराष्ट्रात तरुणांना रोजगार देत नाहीत. आता राज्यातील तरुणांना जर्मनीला पाठविणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आहे. महिला सुरक्षित नाहीत. दोन वर्षात शेतकऱ्यांना, तरुणांना जे हक्काचे आहेत ते मिळालेले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील चित्र बदलले. भाजप म्हणते राज्यघटना बदलाचे विरोधकांनी नरेटिव्ह सेट केले गेले होते; परंतु त्यांना राज्यघटना बदलायची होती, हे सत्य आहे. लोकसभेची निवडणूक राज्यघटना रक्षणाची होती, तर विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. पन्नास खोकेवाल्यांचे भले झाले. कोणाला ७२व्या मजल्यावर घर मिळाले असेल. कोणाला डिफेंडर गाडी मिळाली,’ अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.