लोकसभेला फटका, विधानसभेलाही तोच धोका, अजितदादांच्या ‘त्या’ निर्णयाकडे कार्यकर्त्यांच्या नजरा

दीपक पडकर, बारामती : लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पदाधिकारी बदलले पाहिजेत, असा सूर लावला आणि त्याची दखल घेत अजित पवारांनी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात थेट पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामा घेण्याचे आदेश दिले. दादांच्या आदेशानंतर पुढच्या काही तासांतच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. स्वातंत्र्यदिनापूर्वी मला नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करायच्या आहेत, असे अजित पवारांनी सांगितले होते. पण आता ऑगस्ट संपत आला तरी नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झालेल्या नाहीत.

विधानसभेआधी नवे पदाधिकारी निवडावेत, जर उशीर झाला तर त्याचा फटका विधानसभेलाही बसू शकतो असे कार्यकर्त्यांचे मत आहे. दुसरीकडे अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यभर होत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. इकडे कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल सुरू आहे. बारामतीमध्ये प्रत्येक गावात दोन गट निर्माण करण्यात काही पदाधिकाऱ्यांनी स्वारस्य दाखवल्याने याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत बसला, अशी तक्रार बारामतीतील जुन्या जाणत्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे केली होती.
Ajit Pawar News: विधानसभेला फटका बसू नये म्हणून अजितदादा पाहा काय म्हणाले; तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे रहा, नाही तर…

दादांनी पदाधिकाऱ्यांना राजीनाम्याचे आदेश का दिले?

अजित पवारांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच यासंदर्भात सातत्याने सांगितले जात होते. काही पदाधिकारी जाणून बुजून बदलले पाहिजेत, असा आग्रह ठराविक पदाधिकारी करत होते. परंतु निवडणुकीच्या ऐन काळात अजित पवारांनी निर्णय घेण्याचे टाळले. मात्र, लोकसभेत जे व्हायचे ते झाले. आता तरी अजित पवारांनी तातडीने खांदेपालट करावा, अशी मागणी तालुक्यातील जिरायती भागातील दौऱ्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी केली. त्याची तातडीने दखल अजित पवारांनी घेत कार्यकर्त्यांच्या बूथ मेळाव्यात पहिल्याच मिनिटांमध्ये भाषणाला सुरुवात करताना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने राजीनामे द्यावेत असे आदेश दिले. त्यांच्या या घोषणेमुळे कार्यकर्ते सुखावले. त्यांनी लागलीच टाळ्यांचा गजर केला.
मुंबईत राष्ट्रवादी मजबूत करायची आहे; जनसन्मान यात्रेवेळी अजित पवार यांची माहिती

स्वातंत्र्यदिनापूर्वी निवड होणार या आशेने निवडीकडे डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. कारण अजित पवार व्यस्त असल्याने निर्णय घ्यायला कोणी नाही आणि हा निर्णय होत नसल्याने सक्रीय कार्यकर्ते आणि इच्छुक पदाधिकारी अस्वस्थ आहेत. जर वेळीच खांदेपालट केला नाही तर या नाराजीचा तीव्र फटका विधानसभेलाही बसू शकतो असे मत कार्यकर्ते खासगीत मांडत आहेत. शिवाय दहा-दहा वर्षे, पाच-पाच वर्षे एखादे पद एकाच व्यक्तीकडे गेल्यास नव्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? असा प्रश्नही इच्छुक व्यक्त करताहेत. या सगळ्यावर अजित पवार नेमका कसा आणि कधी तोडगा काढतात? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

शिवाय कोणाला संधी हवी आणि कोणाला संधी नको यावरही उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. ही चर्चा थांबविण्यासाठी पक्षाने एका निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. मात्र गटबाजी थांबण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यावाचून अजित पवार यांच्याकडे पर्याय नाही, हे तितकेच खरे!

Source link

ajit pawarAjit Pawar Vidhan SabhaBaramati Politicsncp ajit pawarNCP Baramati Office bearer Committeeअजित पवार बारामती पदाधिकारीबारामती राजकारणराष्ट्रवादी अजित पवार गट
Comments (0)
Add Comment