टाटांना भेटण्याची लहानपणापासूनच इच्छा होती
उदय सामंत म्हणाले की, ”उद्योगपती रतन टाटा यांना भेटण्याची मला लहानपणापासूनच तीव्र इच्छा होती. कोणाला भेटायचं तर रतन टाटा यांना भेटायचं. त्यानंतर मी उच्च तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असताना लंडन दौर्यावर गेलो असताना ती अधिक द्विगुणीत झाली. त्यावेळेला मला भेट मिळू शकली नव्हती पण ही भेट मी उद्योग मंत्री झाल्यानंतर उद्योगरत्न पुरस्काराचे निमित्ताने हा मोठा योग जुळून आला. यावेळी मी असा बुके देईन तसा बुके देईन अशी शाल घालीन असं मी ठरवलं होतं. पण आमची पहिल्यांदा भेट झाली त्यावेळेला इतका मोठा माणूस किती जमिनीवरती असतो याचं जगातलं मूर्तिमंत उदाहरण मी अनुभवलं”.
मी उठलो आणि मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो
सामंत पुढे म्हणाले की, ”मला टाटांची भेट मिळू शकली नव्हती पण एकदा असाच उठलो. आणि मुख्यमंत्री महोदयांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की साहेब आपल्याला पुरस्कार जाहीर करायचा आहे. मुख्यमंत्री महोदयांनी मला विचारलं आता हे नवीन काय आपल्याकडे महाराष्ट्र भूषण आहे. मग आता उद्योगरत्न कशाला पाहिजे? पण त्यावेळी सांगितलं साहेब आपण हा उद्योगरत्न पुरस्कार ज्या माणसाला देऊ आणि त्यांनी तो जर हा स्वीकारला तर आपलं राज्य उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहे हे निश्चित होईल आणि कालपर्यंत ज्यांनी टीका टिपणी केली जे पत्रकार परिषद घेतात त्यांचे दात घशात जातील. मला मुख्यमंत्र्यांनी नाव सांगा असं विचारलं त्या वेळेला मी सांगितलं रतन टाटा हे नाव सांगितलं एका सेकंदाचा ही वेळ न लावता मुख्यमंत्र्यांनी यासाठी पत्र तयार करण्याचे आदेश दिले पत्र तयार करा रतन टाटांकडे जा आणि त्यांना हा पुरस्कार द्या त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला तर आपलं सरकार चांगलं काम करत आहे. असा चांगला संदेशही जाईल पण मला रतन टाटांना भेटण्यासाठी साहेब तुमचा फोन जाणं आवश्यक आहे. असं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं आणी ‘सीएमओ’ मधून फोन गेला आणि मला रतन टाटा यांची भेट मिळाली. ही भेट मिळाल्यानंतर मला एक आवर्जून सांगायचं आहे की इतका मोठा माणूस पण किती जमिनीवरती असू शकतो यातलं जगातलं एकमेव मूर्तीमंत उदाहरण कोण असेल तर ते रतनजी टाटा आहेत दुसरा पर्याय नाही”. अशा शब्दात उदय सामंत यांनी आपल्या भावना या भेटी मागचा किस्सा सांगताना व्यक्त केल्या.
तुमचा पुरस्कार १०० टक्के स्वीकारणार
”ज्यावेळेला ही भेट झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं उदय तू हा मला पुरस्कार देत आहेस. तो मी शंभर टक्के स्वीकारणार आहे. आणि नुसता स्वीकारणार नाही तर तुझ्या मतदारसंघांमध्ये तुझ्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये तुझे काही सांगशील ते माझ्या सहकाराच्या निमित्ताने मी महाराष्ट्राला बहाल करणार आहे आणि हा माझा शब्द आहे आणि मग आम्ही काम सुरू केलं. उदय सामंत पुढे म्हणाले की, ”मी भेटायला जाणार त्यावेळेला मी ठरवलं होतं की असा बुके द्यायचा असा हार घालायचा अशी शाल घालायची पण जेव्हा माझी गाडी त्यांच्या दारात जाऊन थांबली तेव्हा रतन टाटा मला रिसिव्ह करायला आले मी त्यांच्यासाठी फारच छोटा आहे. माझ्यासारखे जगातले अनेक उद्योग मंत्री बघितलेत अनेक मुख्यमंत्री बघितलेत अनेक पंतप्रधान बघितलेत अनेक राष्ट्राध्यक्ष बघितले आहेत पण रतनजी टाटा यांच्यासारखा माणूस जो काडेपेटी पण तयार करतो आणि विमान पण तयार करतो ते माझं स्वागत करण्यासाठी त्यांच्या घराच्या बाहेर उभे होते.या वेळेला त्यांच्याकडे क्लार्क जरी असला तरी त्यांना तिथे बॉस म्हटलं जातं आणि रतन टाटा यांची ही एक खासियत आहे की ते कितीही लहान मुलाला गरीब माणसाला भेटू देत ते त्याचा उल्लेख बॉस म्हणून करतात. असे गौरव उद्गार उदय सामंत यांनी व्यक्त केले.
लंडनच्या महालासमोरच ताज हॉटेलवर फडकतो आपला राष्ट्रध्वज
उदय सामंत पुढे म्हणाले की , ”मी उच्च व तंत्र शिक्षण खात्याचा मंत्री असताना लंडन येथे गेलो होतो. कोणाला भेटायचं तर रतन टाटा यांना भेटायचं ज्या इंग्रजांनी या देशावरती राज्य केलं ज्या इंग्रजांनी या देशाला वेठीला धरलं दीडशे वर्ष ज्या इंग्रजांनी राज्य केलं त्यांच्या राज्यकर्त्यांचा जो लंडन येथे महाल आहे. त्या महालासमोरच ताज हॉटेल आहे. आणि त्या ताज हॉटेलवर छाती ठोकून ताठ मानेने या रतन टाटा यांनी भारताचा झेंडा लावला आहे हे महत्त्व तिथे गेल्यावर कळतं. आणि असा तसा लावला नाही तर त्या महालात राहणार्या लोकांची परवानगी घेऊन लावला इथे झेंडा लावणार म्हणजे लावणारच नाहीतर मी हॉटेल चालवणार नाही एवढे गट्स ज्याच्यामध्ये आहेत देशाभिमान त्यांच्यामध्ये आहे त्यांना भेटण्याची माझी आतुरता अजून वाढली होती.
पिंपरी चिंचवडमध्ये म्युझियम उभारणार
”या वेळेला झालेल्या चर्चेदरम्यान इतकं मोठं काम अवघ्या जगभरात केलं देशात केलं पण त्या टाटांचे म्युझियम आमच्याकडे नाही. त्या क्षणी त्यांनी विचारलं की उदय याचा इस्टिमेट किती असेल मी म्हटलं तुम्ही ठरवाल ते पण त्यावेळी टाटांनी 300 कोटी रुपये जाहीर केले आणि आज हे म्युझियम पुण्याजवळ पिंपरी चिंचवड येथे याच काम पुढच्या डिसेंबरपासून सुरू होणार आहे”. अशीही माहिती उद्योगमंत्र्यांनी यावेळी दिली.