भगीरथ भालके पंढरपूरमधून लढण्याच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भगीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि भगीरथ भालकेंच्या भेटीत विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. भगीरथ भालके हे पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. भगीरथ भालके यांचा यापूर्वी पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये विधानसभेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
मी विधानसभा लढणार हे अख्ख्या जिल्ह्याला माहिती
शरद पवारांची भेट घेतल्यानंतर भगीरथ भालके म्हणाले की, मी आगमी विधानसभा निवडणूक लढवणार आहे, हे जिल्ह्यातील सर्व जनतेला माहिती आहे. येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. महाविकास आघाडीकडून मला लढण्याची इच्छा आहे. त्यावर शरद पवार साहेबांशी बोलणे झाले आहे अशी माहिती भगीरथ भालके यांनी स्वतः दिली.
सारासार विचार करून निर्णय घेऊ, शरद पवार यांचे आश्वासन
लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आम्ही भक्कमपणे काम केले आहे. आमच्या मतदारसंघातून मताधिक्य देण्याची भूमिका आम्ही पार पडली. त्यामुळे विधानसभेला पंढरपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी आमची मागणी आहे. मी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी आग्रही आहे. शरद पवार माझा नक्कीच विचार करतील. सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेऊ असे आश्वासन शरद पवारांनी दिल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले.
भालकेंचा पोटनिवडणुकीत पराभव
२०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणारे भगीरथ भालके यांचा भाजपच्या समाधान आवताडे यांनी पराभव केला होता. भगीरथ भालके हे दिवंगत नेते व माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली होती.
भारत भालके यांची राजकीय कारकीर्द
दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. २००९ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले.
२०१९ मध्ये भालकेंनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता. त्यामुळे भालके यांच्या घराण्याला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात महत्वाचे स्थान आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके काय निर्णय घेतील, शरद पवार कोणता उमेदवारी देतील, याकडे पंढरपूर मंगळवेढ्यामधील जनतेचे लक्ष लागले आहे.