‘दहीहंडी उत्सवाची पंढरी’ अशी ओळख असलेल्या ठाणे नगरीत दहा मोठ्या दहीहंडी आयोजकांकडून उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शिवसेना (उबाठा), भाजप, मनसे या राजकीय पक्षांकडून दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि आगामी पालिका निवडणुकांचे ब्रॅण्डिंग केले जाणार आहे. शहरात जागोजागी उंचच उंच होर्डिंग आणि बॅनर लावत उत्सवातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. तर दुसरीकडे गोविंदाच्या थरांच्या उंचीसोबतच प्रत्येक राजकीय आयोजकांच्या रकमांचे थर वाढत असल्याने आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरातील प्रमुख गोविंदा पथके ठाण्याकडे कूच करणार आहेत.
विधानसभा निवडणुकांसाठी ब्रॅण्डिंग
ठाण्यासह मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी येथील महायुतीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी हजेरी लावली होती. यंदा शिंदे स्वतः महायुतीच्या प्रत्येक उत्सवस्थळी भेट देण्याची शक्यता आहे. ठाण्यात टेंभी नाका, वर्तकनगरात आमदार प्रताप सरनाईक यांचे संस्कृती युवा प्रतिष्ठान, माजी आमदार रवींद्र फाटक यांचे रघुनाथ नगर येथील संकल्प युवा प्रतिष्ठान, शिवसेना कोपरी विभाग ठाणे पूर्व आयोजित मुख्यमंत्री दहीहंडी उत्सव, शिवसेना माजी नगरसेवक संजय भोईर, साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित उत्सव अशा दहीहंडी आयोजनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वरचष्मा आहे. हिरानंदानी मेडोज येथे भाजप नेते शिवाजी पाटील यांचे स्वामी प्रतिष्ठानचा उत्सव व कॅसल मिल येथे भाजप माजी नगरसेवक कृष्णा पाटील आयोजित गोकुळ महादहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मनसे ठाणे जिल्हा आयोजित दहीहंडी उत्सवाला गेल्यावर्षीप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर राहणार असल्याची माहिती आयोजक व मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
शिवसेनेची (उबाठा) निष्ठेची हंडी
शिवसेना (उबाठा) माजी खासदार राजन विचारे, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित जांभळी नाका येथील दहीहंडी उत्सव येथे ‘निष्ठेची, सुरक्षेची, हिंदुत्त्वाची आणि महिला सक्षमीकरणाची महादहीहंडी’ उभारण्यात येणार आहे. या उत्सवाला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख नेते हजेरी लावणार असल्याचे आयोजक राजन विचारे यांनी सांगितले.