Nashik Vidhan Sabha: लोकसभेनंतर विधानसभेसाठीही काँग्रेस नाशिकच्या आखाड्यात, ७ मतदासंघांवर केला दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसने रणशिंग फुंकले असून, पारंपरिक मतदारसंघांसह अतिरिक्त मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची इच्छादेखील प्रदर्शित केली आहे. शहरात नाशिक पूर्वसह ग्रामीण भागात बागलाण, नांदगाव आणि सिन्नर या तीन मतदारसंघांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे.

लोकसभा निवडणुकीत दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. राज्यातदेखील महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असून, त्यामुळे काँग्रेसमधील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. जिल्ह्यात मालेगाव मध्य, चांदवड, इगतपुरी, नाशिक मध्य हे मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसकडे राहिले आहेत. परंतु, त्याव्यतिरिक्त जिल्हा काँग्रेसने बागलाण, सिन्नर, नांदगाव आणि येवला मतदारसंघांचीही मागणी केली आहे. या मतदारसंघांमध्ये अनेक सक्षम उमेदवार असून, त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यानुसार पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विधानसभेच्या आढावा बैठकीत काही अतिरिक्त जागा काँग्रेससाठी सोडवून घ्याव्यात, असा आग्रह पक्षनेतृत्वाकडे धरला. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघामधून आमदार हिरामण खोसकर यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली. खोसकर यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम नको, अशी भूमिका तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, रमेश जाधव यांनी मांडली.
ज्यांना तुतारीवर लढायचंय त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज भरा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे
नांदगाव मतदारसंघही पूर्वीपासून काँग्रेसकडे होता. परंतु, तो भुजबळांसाठी सोडण्यात आला. मात्र, हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी मांडण्यात आली आहे. बागलाण मतदारसंघ पक्षाकडे घ्यावा, अशी मागणी पक्षाचे प्रदेश सचिव प्रा. अनिल पाटील यांनी केली आहे. शहरात नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. त्याव्यतिरिक्त नाशिक पूर्व मतदारसंघाची जागादेखील काँग्रेससाठी सोडण्यात यावी, असा आग्रह शहर काँग्रेस कमिटीने धरला आहे.
Kolhapur Politics : ठाकरे गटाला झटका, विधानसभेच्या तोंडावर नाराजीचा फटका, बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर

कमिट्या तयार करण्यावर भर

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या सूचनेनुसार बूथनिहाय कमिट्या तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, बूथ कमिट्या, इच्छुक उमेदवारांची माहिती पक्षनेतृत्वाने घेतली. ज्या विधानसभा मतदारसंघांत अद्याप बूथ कमिट्या तयार झालेल्या नाहीत तेथे त्या तत्काळ तयार कराव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. संघटन वाढविण्यासाठी तालुका, तसेच व विविध सेलची कार्यकारिणी तयार करावी, नवीन कार्यकर्त्यांना वाव द्यावा, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या.

Source link

7 seats of nashik assemblyCongressmahavikas aghadimahrashtra Assembly ElectionNashik Vidhan Sabhaकाँग्रेसकाँग्रेसचा नाशिकच्या ७ मतदारसंघावर दावानाशिक विधानसभामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकमहाविकास आघाडीचे जागावाटप
Comments (0)
Add Comment