आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आणली. खरं तर ही योजना अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी आहे. मात्र काही द्राक्ष बागायतदार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. असं जर झालेलं असेल, तर काही न बोललेलं बरं. म्हणजे बघा, परवा पण मी एका भागात होतो. मी नाव नाही सांगणार. पण सगळीकडे असा ऊस… हिरव्यागार कांद्याच्या पातीसारखा दिसत होता… यंदा पावसाळा पण चांगला झाला. त्या ठिकाणी अनेक महिला मला राखी बांधण्यासाठी आल्या होत्या, असं अजित पवार सांगत होते.
त्यावेळी मी महिलांना विचारलं, झाले का तुमचे ‘लाडक्या बहिणी’चे पैसे जमा? त्यावर त्या महिला म्हणाल्या “झाले ना दादा”… मी विचारलं, किती ऊस किती जातो तुमचा? त्यावर त्या महिलेने उत्तर दिलं, “जातो.. पाचशे ते सहाशे टन” असा किस्सा अजित पवार सांगत होते. महिलेचे उत्तर ऐकताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला.
यावेळी अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना आणताना खरं सांगतो, खुरपण करणारी बाई असेल, धुणी भांडी करणारी महिला असो, झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला असो, कचरा गोळा करणारी महिला असेल अशा प्रकारच्या महिलांचा वर्ग खूप मोठा आहे. अशा महिलांना कधी कोणीच विचारात घेतलं नाही. त्याकरता आम्ही ही योजना आणली आहे.
आमचं टार्गेट आहे साधारण दोन कोटी 50 लाखापर्यंत. आतापर्यंत दीड कोटी पर्यंतचे टार्गेट पूर्ण झाले आहे. काही तांत्रिक अडचणी येत आहेत. कधी कधी कोणी चुकीच्या बातम्या पसरवतो की, ही औट घटकाची योजना आहे. बँकेत पैसे आले का रे? लवकर घ्या नाहीतर परत काढून घेतील. अशा चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.