जन्मदाते, तरुण मुलांकडून शोषण
लहान मुलांवरील बहुतांश अत्याचार प्रकरणांमध्ये गुन्हेगार त्यांच्या ओळखीतील असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये जन्मदात्यांकडून; तसेच रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडून लैंगिक शोषण झाल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. घरात पालक नसताना, बाहेर जाताना शेजारच्यांकडे सांभाळण्यासाठी ठेवले असता, नातेवाइकांकडे सुट्टीसाठी गेले असता नातेवाइक, घरातील पुरुष किंवा तरुण मुलांकडून चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.
शाळांमध्ये दामिनी पथकांची धडक
पोलिस आयुक्तालयांतर्गत सर्वच १८ पोलिस ठाण्यांतर्गत स्वतंत्र दामिनी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांत महिला अधिकारी आणि कर्मचारी आहेत. महाविद्यालय आणि शाळा परिसरात पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे. शाळेत गुड टच, बॅड टचबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
मुलांवरही लैंगिक अत्याचार
अल्पवयीन मुली; तसेच मुलांवरही लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. खेळण्यांचे; तसेच चॉकलेटचे, खाऊचे आमिष दाखवून लहान मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केले जाते. काही प्रकरणांमध्ये मुलांचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून दोषारोप…
पोलिसांकडून अत्याचारांच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई केली जाते. तत्काळ गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करून संशयितांना न्यायालयापुढे हजर केले जाते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते जुलैदरम्यान अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांपैकी ५६ प्रकरणी दोषारोपपत्र दाखल केली आहेत. याशिवाय विनयभंगाच्या गुन्ह्यांपैकी ४० प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
पालकांनी मुलांशी सातत्याने संवाद ठेवायला हवा. मुलांच्या वागण्यातील बदलाकडे लक्ष द्यायला हवे. मुलांना गुड टच, बॅड टच याचे शिक्षण द्यावे. विश्वासू लोकांकडे मुलांची जबाबदारी सोपवावी.– संदीप डोईफोडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा