विवेक कोल्हे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. शरद पवारांनी विवेक कोल्हे यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर काम करण्याची संधी दिल्याने आज व्हीएसआयच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि विवेक कोल्हे यांची भेट होणार आहे. त्यामध्ये राजकीय चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे अजित पवारांसोबत गेले. एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले काळे आणि कोल्हे दोन्हीही सध्या महायुतीसोबत आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार असे काळेंनी अनेकदा बोलून दाखवले. त्यामुळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आज विवेक कोल्हे शरद पवारांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
ते पवार गटात प्रवेश करणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आशुतोष काळेंसाठी या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन वेळा दौरा केला. एकीकडे अजित दादा आमदार काळेंची ताकद वाढवत असताना शरद पवारांनी जर तुतारीचा उमेदवार दिला तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कांटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
विखे पाटील व दराडेंना टक्कर
विवेक कोल्हे यांनी गेल्या वर्षी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन ताब्यात घेतला. त्यानंतर विखे पाटलांच्या तालुक्यातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तसेच यावर्षी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले उमेदवार किशोर दराडे यांना टक्कर देऊन कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उभे राहिल्याने त्यांच्या कारखान्यांवर आणि संबंधित शैक्षणिक संस्थांवर शासनाने धाडी टाकल्या. महसूलमंत्री विखे पाटलांना आणि आमदार दराडे यांना टक्कर देऊन विवेक कोल्हे राज्यभर चर्चेत आले.
कोण आहेत विवेक कोल्हे?
विवेक कोल्हे हे कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच साई संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. तर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे ते नातू आहेत. ३३ वर्षीय विवेक कोल्हे यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले आहे. नाशिक येथे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी बीई सिव्हीलची पदवी प्राप्त केली आहे.
विवेक यांनी कोपरगावच्या ग्रामीण भागात पहिले कॉल सेंटर सुरू केले होते, त्यावेळी त्यांची चांगलीच चर्चा झाली होती. ते कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष आहेत. तसेच ते अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्टचे आणि मिल्कचेही संचालक आहेत. कोपरगाव तालुक्यातील युवा नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातंय. त्यांच्या नेतृत्वात संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम वर्ष भर राबवले जात आहे.