भाजपचे कधीकाळी पुणे शहराचे कारभारी राहिलेले आणि पक्षातील पहिल्या फळीतील नेते असणारे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आता भाजप नेते आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दंड थोपटले आहेत. आपण कोथरूड विधानसभा मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत आणि त्याबाबत चंद्रकांत पाटील यांना देखील आपण कल्पना दिली असल्याचं अमोल बालवडकर म्हणाले आहेत. तर चंद्रकांत पाटील आणि माझ्यात मतभेद नसल्याचे देखील बालवडकर यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता अमोल बालवडकर यांच्या दहीहंडी उत्सवाला चंद्रकांत पाटील यांना आमंत्रण असून देखील त्यांनी दांडी मारल्यामुळे पुणे भाजपात आणि विशेषतः कोथरूड विधानसभा मतदारसंघात बालवडकर विरुद्ध चंद्रकांत पाटील असा नवा संघर्ष पाहायला मिळत आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघात येत असणाऱ्या बाणेर बालेवाडी भागात अमोल बालवडकर यांचा आज दहीहंडी उत्सव होता. या उत्सवात भारतीय नेमबाज आणि ऑलिंपिक पदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्निल कुसळेचा नागरी सन्मान करण्यात येणार होता तर पाच लाखांचा धनादेश चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार होता. मात्र बालवडकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात संघर्ष पेटला असल्याने चंद्रकांत पाटील यांनी अमोल बालवडकर यांच्या या दहीहंडी उत्सवाला न येणेच पसंद केल आहे. त्यामुळे आता पुणे भाजपात विसंवादाची हांडी फुटली अन् वादाचे दही पसरले असच म्हणावं लागेल.
एकीकडे महायुतीत सगळं आलबेल असल्याच दाखवत असताना भाजपातच दहीहंडी उत्सवाच्या दिवशी ड्रामा सुरू झाल्याचा पाहायला मिळाले. दरम्यान, संबंधित दहीहंडी उत्सवाच्या आयोजन करणाऱ्या अमोल बलवाडकर यांना चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाबद्दल आमंत्रण दिले गेले नव्हते का? असे विचारला असता त्यांनी आपण नम्रपणे निमंत्रण दिल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांना स्वप्निल कुसळे यांच्या सत्कार बद्दलची पूर्ण कल्पना दिल्याची माहिती सुद्धा दिली.
आता केवळ चंद्रकांत पाटील यांना आव्हान देत अमोल बालवडकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी जी तयारी सुरू केली आहे त्यामुळेच चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या दहीहंडी उत्सवाला हजरी लावत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजपच्या पहिल्या फळीतील नेते असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना थेट नगरसेवक असणाऱ्या युवा नेत्यानेच आव्हान दिल्याने शहरात हा चर्चेचा विषय बनला आहे.