महाविकास आघाडीत पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी काँग्रेसच्या वाट्याला तीन विधानसभा मतदारसंघ येतील. कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंट या तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसकडून भारतीय जनता पक्षाला टक्कर दिली जाईल. कसबा पेठ, शिवाजीनगर आणि पुणे कँटोन्मेंट मतदारसंघांत २०१९च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार निवडून गेले. गेल्या वर्षी कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून धंगेकर विजयी झाले होते. काँग्रेसकडून या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत पारंपरिक उमेदवारांना सोडून नव्या उमेदवारांना संधी देण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
‘कसब्या’त धंगेकरच?
‘कसब्या’चे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांनाच यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळेल, अशी दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव आणि त्यातही ‘कसब्या’त त्यांना बसलेला फटका या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ब्राह्मण चेहरा देण्याविषयी चर्चा झडली आहे. त्यामध्ये रोहित टिळक यांच्या नावाचा विचार करण्यात आला. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत २००९मध्ये टिळक यांनी माजी मंत्री गिरीश बापट यांना चांगली टक्कर दिली होती. त्या निवडणुकीत धंगेकर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’कडून रिंगणात होते. ‘धंगेकरांना मिळालेल्या बहुतांश मतांचा फटका टिळक यांना बसला होता. पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाला काँग्रेसकडून संधी द्यायची असेल, तर कसब्याचा विचार व्हावा,’ अशी भूमिका काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे. असे असले, तरी टिळक काँग्रेसकडून लढण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ‘कसब्या’तून धंगेकर यांनाच उमेदवारी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.
‘कँटोन्मेंट’मध्ये भाकरी फिरणार?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश साळवे यांनी नुकताच काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. साळवे पुणे कँटोन्मेंटमधून उमेदवार ठरण्याची दाट शक्यता आहे. गेल्या तीन निवडणुका पुणे कँटोन्मेंटमधून लढवणारे माजी मंत्री रमेश बागवे यांचा पत्ता कापला जाणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. बागवे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जातात. चव्हाण यांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतरही ते काँग्रेसबरोबरच एकनिष्ठ राहिले. त्यामुळे कँटोन्मेंटमधून त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, गत दोन निवडणुकांमध्ये बागवे यांचा पराभव झाल्याने काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता आणि तो साळवे यांच्या रूपाने पूर्ण झाल्याचे काँग्रेसमधील एका गटाचे म्हणणे आहे.
‘शिवाजीनगर’मध्ये निम्हण?
काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आलेले सनी निम्हण यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपचा रस्ता धरला आहे. निम्हण यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तयारी करण्यात येत आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून गत वेळी निवडणूक लढवलेले दत्ता बहिरट यांनी निवडणूक लढवली होती. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांचा अत्यंत कमी मतांनी पराभव केला होता. या वेळी भाजपकडून शिरोळे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्याने काँग्रेसकडून निम्हण यांच्यावर गळ टाकण्यात आला आहे. निम्हण यांच्याकडून याबाबत खुलासा करण्यात येत नसला, तरी त्यांच्याशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधल्याची चर्चा आहे. त्यांचे वडील माजी आमदार विनायक निम्हण काँग्रेसमध्ये असताना आमदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे सनी निम्हण यांची घरवापसी होणार, अशीही चर्चा रंगली आहे.