मालवण येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या घटनेचा विविध स्तरातून निषेध केला जात आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाच कसा, पुतळ्याचे काम करताना त्यात अनियितता झाली का असा सवाल देखील विचारला जात आहे. पुतळा पडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मालवण दौरा करून तेथील परिस्थिती जाणून घेतली. दरम्यान भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी आघाडीच्या नेत्यांची वाट अडविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हमरातुमरी झाली. अखेर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि पोलिसांच्या मध्यस्थीने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मागे हटले. या सगळ्या राड्यानंतर मालवणमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची छोटेखानी सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत सत्ताधाऱ्यांवर प्रचंड हल्लाबोल केला.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे स्मारक दिमाखात उभे मग भ्रष्टाचारी सरकारने उभारलेला पुतळा कसा पडला
महाराष्ट्राचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज… आमच्या दैवताचा पुतळा बनविणाऱ्या २४ वर्षांच्या पोराला कितीसा अनुभव होता? कोणता अनुभव होता? बरं मालवणमधील महाराजांचा पुतळा हा छत्रपतींचा पुतळा वाटतच नव्हता. १८८६ साली बनविलेला अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे स्मारक आजही ऊन-पाऊस-बर्फाचा मारा झेलत दिमाखात उभे आहे. मात्र मागील ८ महिन्यापूर्वी भ्रष्टाचारी सरकारने उभारलेला हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने पडला, असे हे सांगत आहेत. यांना काहीच कसं वाटत नाही?
कोणत्या तरी नेत्याच्या मुलाचा मित्र आहे म्हणून त्याला पुतळा बनवायला दिला का?
हा २४ वर्षांचा पोरगा आपटे कोण आहे? कोणत्या तरी नेत्याच्या मुलाचा मित्र आहे म्हणून त्याला पुतळा बनवायला दिला का? गुन्हा घडल्यानंतर हा फरार झाला कसा? त्याला फरार व्हायला कुणी मदत केली? कर्नाटकातील बलात्कारी रेवण्णाला पळून जाण्यात भाजपने मदत केली तशी आपटेलाही केली काय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
बाबासाहेबांचे स्मारक देखील असेच बनविणार का?
चांगल्यातून वाईट होणार असेल… असे निर्लज्जपणे इथल्या भागातले मंत्री सांगत होते. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मुंबई शहरात होते आहे. त्याठिकाणी देखील असाच पुतळा बनविणार का? त्यातूनही चांगले होईल का? असे आदित्य ठाकरे म्हणाले.