महाविकास आघाडीचे नेते कोसळलेल्या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. काही वेळातच स्थानिक खासदार नारायण राणेदेखील किल्ल्यावर आले. त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे आणि काँग्रेस नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात संवाद झाला. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं. त्यानंतर राणे पुढे गेले.
प्रसारमाध्यमांना दोन्ही नेत्यांना त्यांच्या आजच्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली होती. महाविकास आघाडीचे नेते पुतळ्याची पाहणी करायला सकाळी साडे दहा वाजता पोहोचणार होते. नारायण राणे आणि भाजपचे कार्यकर्ते दुपारी बारा वाजता किल्ल्यावर येणार होते. मविआचा मोर्चा सकाळी साडे अकरा वाजता सुरु होणार होता. त्यामुळे ठाकरे आणि राणे आमनेसामने येण्याची सुतराम शक्यता नव्हती.
राजकोट किल्ल्यावर पोहोचायला आदित्य ठाकरेंना पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे ठाकरे आणि राणे समर्थक आमनेसामने आले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे परिस्थिती चिघळली. कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे किल्ल्यावर जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूचे नेते माघार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे वातावरण बिघडत गेलं.
आदित्य ठाकरेंचा दौरा उशिरा सुरु झाल्यानं पुढील सगळंच नियोजन चुकलं. ठाकरे आणि राणे समर्थक आमनेसामने आल्यानं परिस्थिती बिघडली. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राणे आणि ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सामोपचारानं प्रकरण मिटवण्याची विनंती केली. पण आधी त्यांना इथून जायला सांगा. आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली. त्यामुळे परिस्थिती चिघळली.