आदित्य ठाकरे किल्ल्यावर पोहोचताच राणे समर्थकांनी त्यांच्या विरोधात घोषणा सुरु केल्या. त्यांच्या घोषणांना ठाकरे समर्थकांनीदेखील घोषणांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे किल्ल्यावरील परिस्थिती चिघळत गेली. त्याचवेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किल्ल्यावर पोहोचले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप तरी त्यांना यश मिळालेलं नाही.
खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांना समजवण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केला. पण निलेश राणेंनी आधी त्यांना बाजूला करा. आम्ही त्यांच्यानंतर जाऊ. आम्ही स्थानिक आहोत. ते बाहेरुन आले आहेत, असा पवित्रा निलेश राणेंनी घेतला. खासदार राणेंनीदेखील आम्ही इथून हटणार नाही. पोलिसांना गोळ्या घालायच्या असतील तर त्यांनी गोळ्या घालाव्यात, अशी भूमिका राणेंनी घेतली.
राणे पितापुत्रांशी बोलल्यानंतर जयंत पाटील माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांशी संवाद साधला. जयंत पाटील यांनी मध्यस्थी करुन कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांनी मुख्य रस्ता मोकळा करावा. आम्ही मागच्या रस्त्यानं जाणार नाही, अशी भूमिका ठाकरेसेनेकडून घेण्यात आली. आधी त्यांना हटवा, अशीच भूमिका ठाकरेसेनेकडूनही घेण्यात आली. त्यामुळे किल्ल्यावर राडा सुरुच आहे. कोणीच माघार घेण्यास तयार नसल्यानं परिस्थिती तणावाची बनली आहे.