महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला देवासमान आहेत. त्यांचा पुतळा वर्षभराच्या आत कोसळणं धक्कादायक असल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेदरम्यान लातूरमध्ये आयोजित एका सार्वजनिक बैठकीत ते बोलत होते. अधिकारी असोत वा कंत्राटदार, दोषींविरोधात कारवाई केली जाईल, अशी ग्वाही यावेळी अजित पवारांनी दिली.
गेल्या वर्षी ४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. त्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर होते. अनावरणानंतर अवघ्या ८ महिन्यांनी शिवरायांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी कंत्राटदारावर एफआयआर दाखल झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पुतळ्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं. लहान लहान भाग जोडून पुतळा उभारण्यात आला. ते भाग जोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या नट, बोल्टला गंज आलेला होता, असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे.
छत्रपतींचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानं महायुती सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटानं यावरुन शिंदे सरकारवर टिकेची झोड उठवली. महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचारानं कळस गाठला आहे, अशा शब्दांत महाविकास आघाडीनं सरकारला लक्ष्य केलं. वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं मूर्ती कोसळली, असा दावा करणं म्हणजे बेशरमपणाची हद्द गाठण्यासारखं असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.
शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं राज्यात अस्वस्थता आहे. सरकारविरोधात महाविकास आघाडी १ सप्टेंबरला मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढेल. यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.