पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणीस यांच्याकडून खूप अपेक्षा होती. मात्र या सरकारमधील गृहखाते राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले असून, देवेंद्र फडणवीसांनी आता राजीनामा द्यावा. गृहमंत्री असताना आर आर पाटील यांच्या काळात महिलांची छेडछाड झाली नाही. परंतु आता मात्र महिला अत्याचाराच्या घटनांनी कहर केला आहे. राज्यातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील व गंभीर असताना यांचे मात्र दिल्ली दौरे चाललेले असतात. त्यांना गृह खाते सांभाळायला वेळ नाही. त्यांना फक्त पक्ष फोडाफोडी, घरे फोडाफोडी आणि इतर गोष्टीत जास्त स्वारस्य आहे.
खरे प्रेम हे खुर्ची, सत्ता आणि ठेकेदारांवरच
पंधराशे रुपयात बहीण भावाचे नाते विकणारे हे सरकार आहे. लोकसभेच्या वेळी सारे ठीक चालले होते. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांना बहीण आठवली. खरे तर यांना तोपर्यंत बहिणीचे प्रेम कळलेच नव्हते. कारण लोकसभेमध्ये यांना जनतेने त्यांची जागा दाखवली. मात्र यांचे खरे प्रेम हे खुर्ची, सत्ता आणि ठेकेदारांवरच आहे, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
नौदलाच्या बदनामीची मोहीम तुम्ही राबवता?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला या सर्वांची चौकशी व्हायला हवी. देवेंद्र फडणवीस हे तर नौदलावर जबाबदारी सोडून मोकळे झाले. जे नौदल आपल्या सर्वांची सुरक्षा करते त्याच्या बदनामीची मोहीम तुम्ही राबवता..? दुसरे दीपक केसरकर हे मंत्री तर अपघात झाला ते बरे झाले असे म्हणतात, कितपत योग्य आहे? असेही सुळे म्हणाल्या.
अन्यथा राज्यातील मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही
बदलापूर प्रकरणामध्ये राज्य सरकारकडे खरोखरच संवेदनशीलता असेल तर तातडीने फास्टट्रॅकमध्ये हा खटला चालवून दोन महिन्याच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. वास्तविक पाहता या राज्य सरकारमध्ये जे मंत्री आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. ते वाचाळवीर आहेत. या वाचाळवीरांना आता राज्य सरकारने आवरावे. अन्यथा राज्यातील मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही, असे सुळे यावेळी म्हणाल्या..