जन संवाद दौऱ्यात श्रीकांत शिंदे हे उत्तर महाराष्ट्रातील ३३ विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये नांदगाव मतदार संघात शिवसेनेचे सुहास कांदे आमदार आहेत. मालेगाव बाह्य मतदार संघात मंत्री दादा भुसे आमदार आहेत. जळगाव ग्रामीणमध्ये मंत्री गुलाबराव पाटील आमदार आहेत. तर चोपडा मतदार संघात लता सोनावणे आमदार आहेत. एरंडोल मतदार संघात शिवसेनेचे चिमणराव पाटील आमदार असून पाचोरा विधानसभा मतदार संघात किशोर पाटील आमदार आहेत.
लोकसभेत महायुतीला अपयश
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून राज्यात पुन्हा सरकार आणण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पावसाळी आधिवेशनात महायुती सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजना राज्यभरात पोहोचण्यासाठी जन सन्मान यात्रा सुरू केली आहे. अशातच आता शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील त्याबाबतची तयारी सुरू करण्यात आली आहे. कारण विधानसभा निवडणूक शिंदेंच्या शिवसेनेचे भवितव्य ठरवणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः प्रचारासाठी मैदानात उतरणार आहे.