विधानसभा निवडणूक आता तोंडावर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यात्रा, सभा आणि आंदोलनाचा धडाका सुरु आहे. अशावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सक्रीय झाला असून त्याने भाजपला बळ द्यायला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत संघाने काहीशी तटस्थ भूमिका घेतली होती. झारखंड येथील पक्ष मेळाव्यात जे.पी. नड्डा यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ही तटस्थता होती असे समजते.
लोकसभा निवडणूक एक हाती जिंकण्याचा भाजपचा विश्वास होता. पण काही राज्यात त्यांना जबरदस्त फटका बसला. त्यानंतर भाजपने संघाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी यश आले असून आता विधानसभेसाठी भाजप-संघात दिलजमाई झाल्याचे समजते. त्यानुसार विधानसभा काबीज करण्यासाठी संघाने भाजपशी सल्लामसलत सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार, संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यात दिल्लीत एक बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आल्याचे समजते.