Pune News: दहीहंडी उत्सवात लेझर बीमचा अट्टाहास महागात; पुण्यात चार संयोजकांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : दहीहंडीच्या दिवशी ‘लेझर बीम’ आणि ‘बीम लाइट’चा वापर करणाऱ्या गणेश मंडळ आणि संयोजकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. हडपसरच्या तीन आणि सहकारनगरच्या एका दहीहंडी संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘गणेशोत्सवात चाप लागणार?’

‘पोलिसांनी काढलेला कायदेशीर आदेश आणि पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलेले आवाहन, यानंतरही दहीहंडीत धिंगाणा घातला गेल्याने गणेशोत्सवात बेशिस्तीला चाप लावण्यात पोलिसांना यश येणार का,’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आदेशाकडे काणाडोळा

दहीहंडी, गणेशोत्सवात ‘लेझर बीम’ आणि ‘प्रखर बीम लाइट’च्या वापरावर बंदी घालण्याच्या पोलिस आयुक्तांच्या आदेशाकडे काणाडोळा करून शहरातील गणेश मंडळे आणि दहीहंडी संयोजकांनी ध्वनीक्षेपकाच्या दणदणाटासह ‘लेझर बीम लाइट’चा मोठ्या प्रमाणावर वापर केला. ‘लाइट शो’साठी एक दिवस आधीपासूनच तयारी केली जात होती; मात्र स्थानिक पोलिसांनी त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्थानिक पोलिसांना बेशिस्त संयोजकांची माहिती गोळा करण्यास सांगितली होती.

नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

दहीहंडीदरम्यान ध्वनी प्रदूषण आणि ‘लेझर बीम लाइट’च्या अतिवापराबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. ‘दहीहंडीला परवानगी देताना पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे दर वर्षी उल्लंघन केले जाते, तरीही पोलिस बेशिस्त संयोजकांना पुन्हा परवानगी देतातच कशी,’ असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

‘११२’ हेल्पलाइनवर १२ तक्रारी

‘ध्वनीप्रदूषण किंवा धोकादायक लेझर बीम लाइटच्या वापराबाबत पोलिसांकडे तक्रार करा,’ अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. ‘मंगळवारी सायंकाळी या संदर्भात शहराच्या वेगवेगळ्या भागांतून पोलिस हेल्पलाइनवर एकूण १२ तक्रारी आल्या आहेत,’ अशी माहिती सहायक आयुक्त विवेक पवार यांनी दिली.

पोलिस आदेश काय?

नेत्रघातक ‘लेझर बीम’च्या वापरावर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा व नियमावली नाही. मात्र, हवाई वाहतुकीला होणारा अडथळा आणि धोका लक्षात घेऊन ‘लेझर बीम लाइट’ आणि ‘बीम लाइट’ आकाशात सोडण्यास बंदी घालण्यात आली. पुढील ६० दिवस ‘लेझर बीम लाइट’च्या वापरावर बंदी घातली आहे. याचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३नुसार कारवाई करण्याचा इशारा पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिला आहे.
Dahi Handi :चाळीतली धम्माल, वर्गणी, घराघरात प्रसाद वाटायचा आणि…संतोष जुवेकरच्या आठवणी वाचून तुम्हीही कराल रिलेट
‘सामाजिक आरोग्याचा विचार मंडळे करणार का?’

‘गणेशोत्सव किंवा दहीहंडी हे लोकांचे उत्सव आहेत. शहरातील आणि शहराबाहेरील लोक मोठ्या संख्येने यात सहभागी होत असतात. मात्र, याच लोकांना त्रास होईल, त्यांच्या जीवावर बेतेल अशा गोष्टी काही मंडळांकडून होत असतात, असे दिसून आले आहे. ही मंडळे सामाजिक आरोग्याचा विचार करून सुधारणा करणार आहेत की नाही,’ असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले आहेत.– जी. श्रीधर, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

मध्यवस्तीतून एकही गुन्हा नाही?

शहरात दहीहंडीचा सर्वाधिक जोर मध्यवस्तीमध्ये होता. या ठिकाणी अनेक मंडळांनी नियमांचे उल्लंघन करून लेझर लाइट, लेझर बीमचा वापर केला होता. ‘परिमंडळ-१’च्या हद्दीत येणाऱ्या या भागांत बहुतांश मंडळांनी लेझर लाइटचा वापर केला असतानाही पोलिसांच्या नोंदीत ‘परिमंडळ-१’मध्ये बुधवारी रात्रीपर्यंत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

Source link

dahi handi pune festivalGaneshotsav 2024laser beem caseLaser light Banpune dahi handi 2024pune local marathi newsताज्या बातम्यापुणे मराठी बातम्यामहाराष्ट्र टाइम्स मराठी पेपर
Comments (0)
Add Comment