काय आहे प्रकरण?
प्रकरणात संदीप शरदराव रायलवार (वय ५०, रा. सिडको, एन-२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संदीप रायलवार सध्या वर्धा एसटी विभागाचे विभाग नियंत्रक म्हणून काम करीत आहेत. ते १२ जानेवारी रोजी घरी असतांना त्यांना मेलिसा नावाच्या महिलेने त्यांना एका ग्रुपवर अॅड केले. शेअर बाजारात गुंतवुणूक करून नफा मिळविण्याविषयी त्यात माहिती देण्यात येत होती. त्यातील अन्य सदस्य नफा मिळाल्याचे सातत्याने सांगत होते. त्या आमिषांना बळी पडून रायलवार यांनी मेलिसाला फोन केला. त्यावर तिने नव्या आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट-तिप्पट नफा मिळेल, असे सांगितले. त्याचे स्क्रीनशॉटही तिने दाखवले. रायलवार यांनी ग्रुपवर दिलेल्या बँक खात्यावर आठ फेब्रुवारी रोजी ४ लाख १४ हजार रुपये टाकले.त्यानंतर त्यांच्या खात्यावर १३ लाख ७७ हजार ५९६ रुपये मिळाल्याचे मेसेज आला . पण, ही रक्कम काढण्यासाठी त्यांना आणखी दहा लाख रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन डाके करीत आहेत.
दुसरी घटना: पुण्यात नोकरीच्या आमिषाने फसवणुक
पुणे : कमांड हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने लष्करातून स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्याने आठ ते दहा जणांची सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर यापूर्वी फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल असून, कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हादेखील कंमाड हॉस्पिटलमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याबाबतचा आहे. या प्रकरणात धनकवडी येथे राहणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून विनायक तुकाराम कडाळे (वय ५३, रा. मार्केट यार्ड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२३ या काळात घडली आहे.