Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक कधी होणार याकडे राज्याचं लक्ष आहे. लोकसभेला राज्यात सत्ताधाऱ्यांची दाणादाण उडाल्यानं विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
राज्यातील मागील विधानसभा निवडणूक हरयाणासोबत झालेली होती. पण यंदा हरयाणात विधानसभेची निवडणूक आधी होणार आहे. त्याबद्दलचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं आहे. हरयाणा, जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. महाराष्ट्रात १२ ते १८ नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक २ टप्प्यांमध्ये होण्याचा कयास आहे. तसं वृत्त एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
प्रशासनानं १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक घेण्याची तयारी सुरु केली आहे. राज्य निवडणूक आयोग लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेईल. त्यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर मग केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पातळीवर हालचाली सुरु होतील. राज्यात दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची सूचना गुप्तचर विभागाकडून करण्यात आलेली आहे.
राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली असल्यानं विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आलेल्या आहेत. पण सध्याच्या घडीला राज्यात आंदोलनांचा जोर वाढलेला आहे. आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनांमुळे सामजिक सलोख्याला नख लागलं आहे. बहिष्काराची, पाडापाडीची भाषा केली जात असल्यानं कायदा, सुव्यवस्थेचा विषय महत्त्वाचा आहे.
राज्यात दोन टप्प्यात निवडणूक झाल्यास प्रशासनाला संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पार पाडता येऊ शकते. एकाच दिवशी मतदान झाल्यास पोलीस प्रशासनासह अन्य यंत्रणांवर ताण पडू शकतो. त्यामुळे प्रशासनानं दोन टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याबद्दल आग्रही आहे. तशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.
२०१९, २०१४, २००९, २००४ अशा गेल्या पाच विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात झाल्या. सगळच्या सगळ्या २८८ मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी मतदान पार पाडलं. १९९९ मध्ये मात्र राज्यात दोन टप्प्यात निवडणूक झालेली होती. ५ आणि ११ सप्टेंबरला राज्यात मतदान झालेलं होतं. त्यावेळी केंद्रात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्त्वात एनडीएचं सरकार होतं. तर राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती. विधानसभा निवडणूक मुदतीपूर्वी झाली होती. ती लोकसभेसोबत घेण्यात आलेली होती.