Sharmila Thackeray Shivaji Maharaj Statue Collapse : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशातच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना तरी सोडा
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ”ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारा आला म्हणून महाराजांचा पुतळा पडला हे ऐकून खूप दु:ख होतंय. त्याच राजकोट किल्ल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला हा अजूनही उभा आहे. महाराजांचे इतके गडकिल्ले आहेत. ते त्यापेक्षा जास्त वारा सोसत असतात. तरी देखील ते अजूनही उभे आहेत. त्यामुळे तुम्ही आता शिवाजी महाराजांना तरी सोडा.” अशी टीका केली आहे.
कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे आहेत
शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या की, ” मुंबई- गोवा रस्त्यासाठी आम्ही आंदोलन करून थकलो आहोत. मुंबई – नाशिक रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कोकणातील लोक कोणत्या रक्ताचे आहेत? जे अजूनही त्यांनाच मतदान करतात. जो पुतळा पडला तो संपूर्ण पोकळ होता. असा पोकळ पुतळा समुद्रकिनारी कोणी उभं करत का? असा सवाल उपस्थित केला आहे.
अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर
सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ” राज्यात महाराजांचे अनेक पुतळे 50 वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची अस्मिता नाही तर संपूर्ण जगाची अस्मिता आहे. महाराजांचा पुतळा तीन महिन्यात घाईघाईत का उभारला? आपटे यांनी तयार केलेल्या पुतळ्यामध्ये त्रुटी आहेत. महाराजांच्या भुवयांच्या वर खोप दाखवल्या गेली आहे. ती खोप का दाखवली हे स्पष्ट झालं पाहिजे आणि आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.