maratha reservation : आज अंतरवाली सराटी येथे जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाची बैठक पार पडली. या वेळी जरांगे यांनी आरक्षण, उपोषण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मराठ्यांना १० टक्के आरक्षण मान्य नाही
जरांगे पाटील म्हणाले की, ” कुणबीच्या ५७ लाख नोंदी सापडल्या आहे, त्यावरून दीड कोटी लोकांना आरक्षण मिळालं आहे. मराठ्यांना राज्य सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण मान्य नाही. निवडणूक झाली की हे आरक्षण टिकणार नाही. मराठा समाज एक झाला तर कोणताही प्रश्न चुटकी सरशी सोडवला जाऊ शकतो”.
शिंदे समिती रेकॉर्ड तपासत नाही
जरांगे पुढे म्हणाले की, ”शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही ही समिती रेकॉर्ड तपासत नाही. त्यांनी सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाही. आमची लोकसंख्या कशी काय कमी होते? फडणवीस यांनी गणित शास्त्रज्ञ म्हणून भुजबळ यांना आणलं आहे का? आमच्या आरक्षणाची टक्केवारी कमी कशी काय केली जाते?” असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
फडणवीसांवर हल्लाबोल
जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” राज्यात लाखो मराठ्यांवर गुन्हे दाखल केले. आमच्यावर मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना फडणवीस यांनी बढती दिली. फडणवीस तुम्ही कितीही योजना आणल्या तरी आम्ही तुमच्या ११३ आमदारांची वाट लावणार.” असा इशारा जरांगे यांनी दिला आहे
२९ सप्टेंबरला उपोषण करणार
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ”आपल्या आंदोलनाला एक वर्ष झाले. तरी प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे आता मागे हटणार नाही. मराठा समाज असा एकजूट राहिला तर हा प्रश्न सुटेल. आता आपल्याला २९ सप्टेंबर रोजी उपोषण करायचे आहे. आणि ते राज्यभर असेल. हे उपोषण शेवटचे आणि आरपारचे उपोषण असेल.” असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले.