MH Election 2024 : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. अकोला येथे राष्ट्रीय समाज पक्षाचा 21 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात जानकर बोलत होते.
आमच्या पक्षाचा जनाधार वाढावा ही आमची इच्छा
महादेव जानकर म्हणाले की, ”आम्ही महायुतीचा घटकपक्ष आहोत, घटकपक्ष हा युतीची तयारी करत असतो. शेवटच्या पाच दहा मिनिटात युती होत असते. त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं आपला जनाधार वाढला पाहिजे. त्यासाठी आमच्या राज्याच्या कार्यकारणीने ठरवलं आहे. आम्हाला 288 जागा लढवायच्या की नाही? त्यांच्याकडून ठराव आल्यानंतर मंथन करू मात्र आज प्रत्येक मतदारसंघात संघटन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. जागा वाटपाबाबत अद्यापही महायुतीतील कोणत्याच नेत्यांशी चर्चा झाली नाही. पण आमच्या कार्यकारणीने ठरवलं आहे, त्यानुसार 288 मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापैकी 109 ठिकाणी आमचं पोलिंग बूथ तयार झालं आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसीतून नाही
मराठा आरक्षणावर बोलताना महादेव जानकर म्हणाले की, ”मराठ्यांना आरक्षण मिळावे मात्र ओबीसीतून देऊ नये. महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी”. असेही जानकर म्हणाले. तर नारायण राणे यांच्या वक्तव्यावर ही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून राजकारण होऊ नये मात्र हे दुर्दैवी आहे. मिडियाशी बोलताना आपण संयमाने बोललं पाहिजे असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.
दरम्यान, महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडूनही तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू आहेत. तिसऱ्या आघाडी बाबत निर्णय आपण 15 दिवसांत जाहीर करू असं बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतल्यानंतर वक्तव्य केले आहे. तर आता दुसरीकडे महायुतीतील आणखी एक घटक पक्षाने स्वबळाची तयारी सुरू केली आहे.