Chhatrapati Shivaji Maharaj Statue: शिवपुतळा दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री उशिरा सर्व संबंधितांची बैठक घेतली. पुतळा कोसळण्याचे कारण शोधून जबाबदारी निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय त्यात घेण्यात आला.
हायलाइट्स:
- नौदल अधिकाऱ्यांसह अभियंते, शिल्पकारांचा समावेश
- राजकोटचा परिसर संरक्षित करण्याची नौदलाची मागणी
- हवामान, वाऱ्याचा विचार करूनच आता पुतळाउभारणी
पुतळा उभारण्यासाठी नेमण्यात आलेली समिती हवामान, वाऱ्याचा वेग या गोष्टींचा विचार करून कायमस्वरूपी मजबूत आणि भक्कम पुतळा उभा राहील, यासाठी निर्णय घेईल. मालवण, राजकोट येथे जागेची पाहणी करणे आणि पुन्हा पुतळा उभारणीच्या कामासाठी नौदलाने हा परिसर संरक्षित करण्याची मागणी केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (नगर विकास) असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस अॅडमिरल अजय कोचर, नौदल महाराष्ट्र क्षेत्र प्रमुख रिअर अॅडमिरल मनीष चढ्ढा, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके आदी उपस्थित होते.
‘शिवचरणी शंभर वेळा
डोके ठेवण्यास तयार’
‘छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत, अस्मिता आणि श्रद्धास्थान आहेत. शिवाजी महाराजांच्या चरणांवर एकदा नव्हे, तर शंभर वेळा डोके ठेवायला आम्ही तयार असून, महाराजांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही’, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवपुतळा दुर्घटनेचे राजकारण थांबवण्याचे आवाहन विरोधकांना गुरुवारी केले.
मालवणच्या राजकोटवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांतच कोसळल्याने विरोधकांच्या महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी घटनास्थळी जाऊन आंदोलन केले. महाविकास आघाडीच्या वतीने रविवारी सरकारच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येणार असून, विरोधी पक्षाने या प्रकरणी सरकारच्या माफीनाम्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. ‘नौदलाने चांगल्या भावनेने पुतळा उभारला होता; पण पुतळ्याबाबत दुर्दैवी घटना घडली. त्यावरून विरोधकांनी राजकारण करू नये. विरोधकांना राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत, असे शिंदे यांनी सुनावले.
‘महाराजांची माफी मागायला मला कुठलाही कमीपणा वाटणार नाही. त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करीत आहोत. त्यामुळे आम्ही महाराजांसमोर नतमस्तक होतो. आता महाराजांचा रुबाबदार पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील, यासाठी विरोधकांनी विधायक सूचना करून सरकाराला सहकार्य करावे,’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.