Byculla Underground Aquarium: महापालिकेने राणीच्या बागेतच भुयारी मत्स्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला. हे मत्स्यालय आधी वरळी येथे होणार होते. मात्र सत्तापरिवर्तन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते राणीच्या बागेतच उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हायलाइट्स:
- प्रकल्पासाठी ५०० कोटींहून अधिक खर्च
- व्यवहार्यता अभ्यास अहवालानंतर प्रकल्प मागे पडला
- दीपक केसरकर यांच्याकडून पुन्हा स्वारस्य
पालकमंत्री केसरकर यांनी महापालिकेला मफतलाल कंपनीच्या जागेत मत्स्यालय उभारण्यासाठी निर्देश दिले आहेत. मात्र वर्षभरापूर्वी याच मत्स्यालयासाठी व्यवहार्यता तपासण्यात आली होती. त्यात यासाठी ५०० कोटींहून अधिक खर्च होणार असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी रूची न दाखवता या प्रकल्पाला नकार दिला. त्यामुळे पेंग्विन कक्षासमोरच लहान स्वरूपात मत्स्यालय करण्याचे नियोजन करत, त्यासाठी ६० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी महापालिकेने ठेवली. मात्र पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर ‘मफतलाल’च्या जागेत भुयारी मार्ग मत्स्यालयासाठी चाचपणी होणार असून, यासंदर्भात महापालिका आयुक्ताशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘हे पैसे पायाभूत सुविधांवर खर्च करावेत’
‘या खर्चिक प्रकल्पाला शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. ‘मुळात आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना या प्रकल्पाचे कंत्राट देण्यासाठी ही धडपड सुरू आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रकल्पावर ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा ते मुंबईतील पायाभूत सुविधांवर खर्च केले तर बरे होईल. व्यवहार्यता तपासणीनंतर प्रकल्प खर्चिक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही त्यासाठी अट्टहास का? आमचा त्याला तीव्र विरोध आहे’, असे काँग्रेसचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा नमूद केले.
खर्चिक प्रकल्प कशासाठी? भायखळ्यातील भुयारी मत्सालयाला शिवसेना ठाकरे गट, कॉंग्रेसच विरोध
‘निधी आणणार कुठून?’
‘मुंबई महापालिकेची सद्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. आधीच मोठमोठे प्रकल्प होत आहेत. त्यासाठी निधी आणणार कुठून, असा प्रश्न आहे. भुयारी मत्स्यालय खर्चिक असल्याने हा प्रकल्प आधीच महापालिकेने बाजूलाच ठेवला होता. त्यापेक्षा मरिन ड्राइव्ह येथील बंद असलेल्या मत्स्यालयाचे नूतनीकरण करावे. या खर्चिक प्रकल्पाला आमचा विरोध आहे’, असे शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी सांगितले.