Jitesh Antapurkar : नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपाची वाट धरली आहे.
जितेश अंतापूरकर यांनी नुकत्याच झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले असा आरोप करत, काँग्रेसने अंतापूरकर यांची हक्कालपट्टी केली आहे. प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी आज जाहीर घोषणा करत अंतापूरकर यांना पक्षातून काढून टाकले आहे अशी माहिती दिली. जितेश अंतापूरकर यांच्यासोबत झिशान सिद्दीकी यांनासुद्धा पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. जितेश अंतापूरकरांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यतेचा राजीनामा दिला. त्यानंतर अंतापूरकर यांनी दुपारी भाजपात प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर भाजपात जाणार अशी चर्चा रंगली होती.
जितेश अंतापूरकर नांदेडचे असून अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात अंतापूरकर यांच्या राजकीय कारकर्दीला सुरुवात झाली होती. अशोक चव्हाणांच्या भाजपमधील प्रवेशानंतर जितेश अंतापूरकर यांच्याबद्दल सुद्धा विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. जितेश अंतापूरकर यांना अशोक चव्हाणाचे खंदे समर्थक मानले जाते त्यामुळे चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अंतापूरकर सुद्धा भाजपात जाणार अशीच चर्चा होती.
भाजपकडून काँग्रेसला धक्का! जितेश अंतापूरकरांचा पक्षप्रवेश, अशोक चव्हाणांनी दिल्या शुभेच्छा
जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी काही दिवसांपूर्वीच सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच जितेश अंतापूरकरांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा अंतापूरकर यांनी केला होता. पण आज अखेर अंतापूरकरांनी महायुतीची वाट पकडली आहे.