Gokul dudh sangh annual meeting : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह कार्यकर्त्यांनी बॅनर झळकावून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली होती. या प्रकरणावरून आमदार सतेज पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाडिक यांचा टीआरपीसाठी खटाटोप
सतेज पाटील म्हणाले की, ”विरोधी संचालिका शौमिका महाडिक केवळ टीआरपीसाठी गोंधळ घालत आहेत, त्या आज आंदोलन करत आहेत त्या 70% बोर्ड मिटींगला आलेल्या नाहीत, नंतर येऊन सह्या करतात. एवढं जर गोकुळवर प्रेम आहे तर त्यांनी बोर्ड मिटींगला आलं पाहिजे. गोकुळच्या सभासदांचे त्यांना दुःख नाही, गोकुळ मधील त्यांचे टँकर बंद झाले हे त्यांचे दुःख आहे. या दु:खा पोटीच त्यांचं हे आंदोलन सुरू आहे”. मात्र सभासदांच्या हितासाठीच गोकुळचा कारभार सुरू असल्याचं आमदार पाटील यावेळी म्हणाले.
संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये
मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, ”पशुवैद्यकीय महाविद्यालय शासनाकडून काढण्यात येणार आहे. महाविद्यालय कुणालाही खासगी स्वरूपात चालवू न देण्याचा ठराव गोकुळ कडून करण्यात आला आहे. गाईच्या दुधाला देशात सर्वाधिक दर गोकुळ ने दिला असून संघाला बदनाम करण्यासाठी कोणी प्रयत्न करू नये.”
महाडिकांचा आरोप काय?
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ हा जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या मालकीचा आहे, संघाच्या पैशातून पशुवैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा घाट का घातला जात आहे? याला आमचा विरोध आहे. दूध उत्पादकांकडून वर्षाला 240 दिवस 50 लिटर दुध संकलनाची अट रद्द करण्याला विरोध करत सभासदांच्या मालकीच्या असणाऱ्या ठेवी सत्ताधारी मंडळींनी मोडीत काढल्या असा आरोप विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांनी केला आहे.