Kalyan News: उंबर्डे प्लांटपासून आधारवाडी डम्पिंगपर्यंत जाणाऱ्या रिंगरोडवर मोठ्या प्रमाणावर कचरा कसा असतो, या प्रश्नाचा शोध घेतला असता, रात्रीच्या अंधारात कंत्राटदाराचा खेळ सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली.
हायलाइट्स:
- पालिकेला याची माहितीच नाही
- कोट्यवधींचा खर्च पाण्यात
- दुर्गंधीने वाडेघर, आधारवाडी परिसरातील नागरिक त्रस्त
शहरातील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करत, डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवली शहरात दररोज तयार होणारा ७५० टनांपेक्षा जास्त कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा ७० आर सी गाड्यांमधून उंबर्डे प्लांटवर प्रक्रियेसाठी नेला जातो. दररोज ८० ते ८५ फेऱ्यांद्वारे शहरातील कचरा नेला जातो. या प्लांटमध्ये दररोज ३०० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असताना, प्रत्यक्षात प्लांटमध्ये ५०० टनांपेक्षा जास्त कचरा नेला असल्याने या कचऱ्यावर प्रक्रिया करता येत नाही. मात्र, ज्यादा यंत्रे बसवून कचऱ्याची विल्हेवाट लावत चार महिन्यात उंबर्डे प्लांटवरील कचऱ्याचा डोंगर कमी करण्याचे आश्वासन ‘नेकॉब वेस्ट हॅण्डलिंग प्रा. लि.’ या कंत्राटदार कंपनीकडून पालिकेला देण्यात आले. मात्र, कंत्राटदाराकडून खरोखरच या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते का? याची पाहणी पालिकेने केलेली दिसत नाही. उंबर्डे प्लांटपासून आधारवाडी डम्पिंगपर्यंत जाणाऱ्या रिंगरोडवर मोठ्या प्रमाणावर कचरा कसा असतो, या प्रश्नाचा शोध घेतला असता, रात्रीच्या अंधारात कंत्राटदाराचा खेळ सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली. प्रक्रियेसाठी उंबर्डे प्लांटवर नेला जाणारा कचरा रात्रीच्या अंधारात तसाच डंपरमध्ये भरून तो रिंग रोडमार्गे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात असून, रात्रभरात किमान २० ते २५ डंपर कचरा आधारवाडी डम्पिंगवर फेकला जात असल्याने या कचऱ्याच्या दुर्गंधीने वाडेघर, आधारवाडी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे.
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरील रस्त्यात अडथळा ठरत असलेला कचरा काढत रिंग रोडचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासनाकडून तसेच महापालिकेच्या निधीतून कोट्यवधींचा खर्च केला जात असताना, आधारवाडी डम्पिंगवर ओल्या कचऱ्याची आवक सुरूच असल्याने स्थानिक नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. मात्र, पालिका प्रशासन याबाबत पूर्ण अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे.