Dahanu-Nashik Railway Line : मुंबई उपनगरातील प्रवाशांना शहरात न येता थेट त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी नवा रेल्वेमार्ग उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. डहाणू रोड ते नाशिक या दरम्यान नवीन रेल्वेमार्ग उभारण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. बोरिवली ते डहाणू रोड या दरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना कमी वेळात नाशिक गाठता येणार आहे.
देशातील धार्मिक स्थळे रेल्वेमार्गाने जोडण्यास रेल्वे मंडळाचे प्राधान्य आहे. त्यानुसार चार धाम, १२ ज्योतिर्लिंगे यांना रेल्वेच्या नकाशात स्थान देण्यासाठी नव्या रेल्वेमार्गांची आखणी करून मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाला पाठवण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय रेल्वेंना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील डहाणू रोड ते नाशिक ही दोन शहरे सुरक्षित आणि वेगवान पर्यायाने जोडण्यासाठी मध्य रेल्वेने प्रस्ताव तयार केला आहे. डहाणू रोडवरून वाणगाव-त्र्यंबकेश्वर या मार्गे नाशिक रेल्वे स्थानकाला जोडण्याचे प्राथमिक नियोजन आहे. प्रकल्पातील १०० किमीच्या स्थान सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यासाठी २.५० कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन रेल्वे मार्ग उभारण्यापूर्वी वाहतूक सर्वेक्षण, टोपण सर्वेक्षण, प्राथमिक सर्वेक्षण आणि अंतिम स्थान सर्वेक्षण असे टप्पे पार पडतात. अंतिम स्थान सर्वेक्षणात संभाव्य रेल्वे स्थानक आणि रेल्वेमार्गासाठी अचूक खर्च तयार करण्यात येतो. हा खर्च मंजूर झाल्यानंतर रेल्वेमार्ग उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येते, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नवा रेल्वेमार्ग नाशिक, पालघर जिल्ह्यातून जाणारा असल्याने त्या परिसरात नवी रेल्वे स्थानके येतील. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार आहे. १२ ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वरचा समावेश होतो. नाशिकमध्ये पंचवटी, त्र्यंबकेश्वर, काळाराम मंदिर अशी धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. नाशिकपासून वणी सप्तश्रृंगी गड येथे जाणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. नव्या रेल्वेमार्गामुळे राज्यातील पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.