Maharashtra BJP Politics: नवी मुंंबईतील भाजपच्या दोन आमदारांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच जुंपली आहे. मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांच्यात सध्या वाकयुद्ध रंगलं आहे.
बेलापूरमध्ये सुपर स्पेशॅलिटी रुग्णालयासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत म्हात्रेंनी नाईकांचा समाचार घेतला. स्वत: काम करायचं नाही आणि मी काम करायला गेले की त्यात खो घालायचा. पालिकेनं निधी दिला नाही म्हणतात. मग तुम्ही काय करत होतात. तुम्ही तर पालकमंत्री होतात. तुम्हाला का निधी आणता आला नाही, असा सवाल त्यांनी विचारला.
रुग्णालयाचं काम सुरु झालं आहे. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. या कामात आडकाठी आणू नका. अन्यथा मग भांडाफोड करावा लागेल. कोविड काळातल्या फाईल माझ्याकडे आहेत. किती लॅबमध्ये कुठे कुठे गेले? सगळ्या फाईल आहेत. काढू का कोविड काळातली एक तरी फाईल? कोविड काळात कोणी पैसे लुटले? असे सवाल करत म्हात्रेंनी नाईकांवर निशाणा साधला.
नेमकं राजकारण काय?
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते संदीप नाईक बेलापूर मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. म्हात्रेंच्या मतदारसंघात त्यांनी संपर्क कार्यालय उघडलं आहे. बेलापूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नाईक यांची तयारी सुरु झाल्यानं म्हात्रे सावध झाल्या आहेत. त्यामुळे एकाच पक्षात असलेल्या नाईक आणि म्हात्रे यांच्यात ठिणग्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसू लागलं आहे.
गणेश नाईक ऐरोलीचे आमदार आहेत. तर मंदा म्हात्रे बेलापूरच्या आमदार आहेत. गणेश नाईक यांना ऐरोलीतून पुन्हा एकदा विधानसभेची उमेदवारी हवी आहे. पण हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. इथून शिंदेसेनेच्या विजय चौगुले यांचं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळे नाईक यांना मतदारसंघावर पाणी सोडावं लागू शकतं. शिंदे आणि नाईक यांचं विळ्याभोपळ्याचं नातं आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ठाण्याची जागा शिंदेसेनेला सुटल्यानं नाईक नाराज झाले. त्यांनी विषय राजीनाम्यापर्यंत नेल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर नाराज असल्याचं समजतं.
ऐरोलीची जागा शिंदेसेनेला सुटण्याची शक्यता असल्यानं नाईक यांनी मंदा म्हात्रेंच्या बेलापूर मतदारसंघात तयारी सुरु केली आहे. गणेश नाईक यांच्या मुलालादेखील विधानसभेचं तिकीट हवं आहे. त्यामुळे म्हात्रे आणि नाईक यांच्यात ठिणग्या पडू लागल्या आहेत. मंदा म्हात्रे बेलापूरची जागा सोडण्यास तयार नाहीत. २०१४, २०१९ मध्ये त्यांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता त्या हॅट्ट्रिक करण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत.