Setback To Sujay Vikhe Patil: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर संशय घेत पडताळणीची मागणी केली होती. यावर आज निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र सुरक्षित होती. त्यात कोणताही छेडछाड झालेली नाही, असे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या मागणीसाठी अर्ज केलेले भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासह देशातील अन्य चौघांचे अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विखे यांच्यासह आठ उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे यंत्राणाच्या तपासणीची मागणी केली होती. विखे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी सुमारे २९ हजार मतांनी पराभव केला होता. त्यावर विखे यांनी इव्हीएमवर संशय घेत पडताळणीची मागणी केली होती. त्यासाठीचे १८ लाख रुपयांचे शुल्कही भरले होते. त्यांनी सांगिलेल्या केंद्रावरील यंत्रणाची आयोगाने तपासणी केली. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नसल्याचे याचिका निकाली काढण्यात आली. यामुळे इव्हीएम सुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, विखे यांनी लंके यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात दाखल केली आहे. त्यामध्ये न्यायालयाने लंके यांना समन्स पाठविले असून २ सप्टेंबरला बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या मतदारसंघातून लंके यांनी तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. या पराभवानंतर सुजय विखे यांनी ४० मतदान केंद्रावरील EVM आणि व्हीव्हीपॅटची पुन्हा पडताळणी करण्याची मागणी केली होती. विखेंसह देशातील एकूण चार उमेदवारांनी अशा प्रकारची मागणी केली होती ज्यावर आज आयोगाने निकाल दिला. आयोगाकडे तक्रार देण्यासोबत सुजय विखे यांनी लंके यांनी निवडणुकीत खर्चाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे सांगत कोर्टात याचिका दाखल केली. निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा लंकेंकडून २८ हजार ९२९ मतांनी पराभव झाला होता.