आधी पवारांची भेट, आता भाजपच्या अधिवेशनाला दांडी; माजी मंत्री विधानसभेआधी वाजवणार तुतारी?

Maharashtra BJP Politics: इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्ध पाटील यांनी आता भाजपच्याच जिल्हा अधिवेशनाला दांडी मारली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पुणे: विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सध्या पक्षात अस्वस्थ असल्याचं दिसत आहे. पक्षानं आयोजित केलेल्या जिल्हा अधिवेशनाकडे पाटील यांनी पाठ फिरवली आहे. या कार्यक्रमासाठी पाटील यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पुण्याच्या दौंडमध्ये अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पण या कार्यक्रमाकडे पाटील यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे इंदापूरातून लढण्यास इच्छुक असलेल्या पाटील यांची नाराजी कायम असल्याचं दिसून आलं आहे. पाटील १९९५ ते २०१४ अशी १९ वर्षे इंदापूरचे आमदार राहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती.

सलग तीनदा अपक्ष आणि एकदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले हर्षवर्धन पाटील गेल्या १० वर्षांपासून विधिमंडळाचे सदस्य नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला. आता पाटील तिकिटासाठी संघर्ष करत आहेत. महायुतीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. पण सत्ताधारी युतीमध्ये सीटिंग गेटिंगचा फॉर्म्युला निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. तसं झाल्यास इंदापूरची जागा भरणेंमुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटेल. त्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत. तिकिटासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

लोकसभेला मदत करा, विधानसभेला आम्ही तुम्हाला मदत करु, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी दिलेला होता. पण आता ते शब्द फिरवत आहेत, असा पाटील यांचा आक्षेप आहे. आपल्यासोबत असं वारंवार घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा मात्र आपण माघार घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीत इंदापूरवरुन ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आता पाटील यांनी थेट भाजपच्याच कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं त्यांच्या नाराजीची चर्चा जोर धरु लागली आहे.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjpHarshwardhan PatilIndapur NewsncpSharad Pawarइंदापूर विधानसभामहाराष्ट्र राजकीय बातम्याहर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभाहर्षवर्धन पाटील भाजपहर्षवर्धन पाटील भाजपच्या कार्यक्रमाला गैरहजर
Comments (0)
Add Comment