Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रेशीमबागेत असलेल्या हेडगेवार, गोळवलकर यांच्या समाधीस्थळाचं दर्शन टाळलं. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस समाधीस्थळी वंदनासाठी गेले. पण अजित पवार मात्र तिथे गेले नाहीत.
लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपल्यानंतर तिन्ही नेते व्यासपीठावरुन निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेणं टाळलं. अजित पवार संघाच्या माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले.
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन रेशीमबाग परिसरात करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कारचा ताफा उभा करण्याच्या जागी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे बराच चिखल झाला. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तिघांच्या ताफ्यातील कार संघाच्या रेशीमबागेतील कार्यालय परिसरात उभ्या केल्या. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर तिन्ही नेत्यांना मैदानातून रेशीमबाग कार्यालयात येऊन तिथून आपल्या ताफ्यातील कारमध्ये बसून पुढील प्रवासासाठी निघायचं होतं.
उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आधी खाली उतरले. तिथून ते रेशीमबाग कार्यालयात गेले, कारमध्ये बसले आणि त्यांनी पुढील कार्यक्रमस्थळ गाठलं. शिंदे, फडणवीस यांनी मात्र माजी सरसंघचालक हेडगेवार आणि गोळवकर यांच्या स्मृतीभवनावर जाऊन वंदन केलं. त्यानंतर ते पुढी कार्यक्रमासाठी रवाना झाले.
Ajit Pawar: शिंदे, फडणवीस हेडगेवारांच्या स्मृतीभवनावर; अजित पवारांनी दर्शन टाळलं, ताफा घेऊन तडक निघाले
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधास्थळी जाणं जाणूनबुजून टाळल्याची चर्चा आहे. यामागे त्यांच्या पक्षाची सर्वधर्मसमभाव मानणारी विचारधारा हे महत्त्वाचं कारण आहे. लोकसभेच्या निकालानंतर संघाशी संबंधित नियतकालिकांनी अजित पवारांसोबत हातमिळवणी करण्याचा भाजपचा निर्णय चुकल्याचं विश्लेषण करत टिकेची झोड उठवली. अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजप ब्रँड डॅमेज झाल्याची टीका ऑर्नगायझर नियतकालिकानं केली होती.